राष्ट्रवादी आणि मनसेची अळीमिळी गुपचिळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 00:08 IST2020-08-22T00:08:24+5:302020-08-22T00:08:30+5:30
राष्ट्रवादी राज्याच्या सत्तेत सहभागी असेलही, पण ठाणे महानगरपालिकेत विरोधी बाकावर आहे.

राष्ट्रवादी आणि मनसेची अळीमिळी गुपचिळी
ठाणे : खड्ड्यांच्या मुद्यावर काँग्रेस आणि भाजपने आंदोलन करून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविली आहे. मात्र, दरवर्षी या मुद्यावर रान पेटवणाºया राष्ट्रवादी आणि मनसेची अद्याप अळीमिळी गुपचिळी का, असा सवाल राजकीय वर्तुळात केला जात आहे. राष्ट्रवादी राज्याच्या सत्तेत सहभागी असेलही, पण ठाणे महानगरपालिकेत विरोधी बाकावर आहे. असे असतानाही राष्ट्रवादीने याविरोधात साधा शब्दही उच्चारलेला नाही.
शहराच्या विविध भागांत खड्ड्यांनी ठाणेकरांचे कंबरडे मोडले आहे. मागील वर्षी मुंब्रा आणि कळव्यात खड्डे नव्हते. यंदा मात्र त्या भागातही खड्ड्यांचे साम्राज्य आहे. दरवर्षी या मुद्यावर राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक होतात. परंतु, यंदा गणेशोत्सव तोंडावर असतानाही राष्ट्रवादीला शहरातील खड्डे दिसत नाहीत का. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनादेखील शहरातील आणि कळवा, मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील खड्डे दिसत नाहीत का. ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी विरोधी बाकावर आहे, हे राष्ट्रवादीचे नगरसेवक, शहराध्यक्ष विसरले का, असा सवाल आता ठाणेकर करू लागले आहेत. अशीच अवस्था मनसेचीहीआहे. कोरोनाच्या काळात विविध विषय घेऊन मनसेने पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची झोप उडविली. आता त्यांच्या पदाधिकाºयांना खड्डे दिसत नाहीत का, असा सवाल उपस्थित झाला आहे.