Seagulls should not be played with by giving them artificial food | सीगल्सला कृत्रिम खाद्यपदार्थ देऊन त्यांच्या जीवाशी खेळू नये

सीगल्सला कृत्रिम खाद्यपदार्थ देऊन त्यांच्या जीवाशी खेळू नये

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सध्या तलावपाळी येथे मोठ्या प्रमाणावर सीगल्स म्हणजेच कुरव पक्षी पाहायला मिळत आहेत. या पक्ष्यांना इतक्या जवळून पाहणे ही ठाणेकरांसाठी पर्वणीच आहे; परंतु या पक्ष्यांना तलावपाळी येथे फिरायला येणारे ठाणेकर कृत्रिम खाद्यपदार्थ खायला घालून त्यांना त्यांच्या मूळ खाण्यापासून परावृत्त करत आहेत. सीगल्स म्हणजेच कुरव पक्षी हे सर्वभक्षी असल्याने त्यांना अशा प्रकारचे कृत्रिम खाद्य देऊन त्यांच्या जिवाशी खेळणे थांबवावे. यासाठी  पक्षीप्रेमींनी रविवारी सकाळी तलावपाळी येथे जनजागृती केली. 


येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीच्या सहभागी संस्था व मराठा जागृती मंच, ठाणे यांनी ही माेहीम राबविली. पाणथळ जागांवरच्या अधिवासात सामान्यतः जिवंत व मृत  छोटे मासे, खेकडे, किडे यावर कुरव पक्ष्यांची गुजराण चालते. त्यांना परतीच्या प्रवासासाठी लागणारी ऊर्जा नैसर्गिकरीत्या प्राप्त होत असलेल्या या अन्नाद्वारे प्रथिने व जीवनसत्वांमधून मिळते. अतिरिक्त ऊर्जा ही चरबीच्या रूपात शरीरात साठवून ठेवली जाते. परतीच्या प्रवासात अन्नाबाबत शाश्वती नसते, तसेच प्रवास निर्धारित वेळेत पार पाडावयाची असतो, कारण विणीच्या हंगामासाठी त्यांना हिमालयामधील आपल्या अधिवासात त्याची जय्यत तयारी करावयाची असते. ही सर्व गणिते जुळवायची तर त्यांचा विणीपूर्व स्थलांतराचा हंगाम हा चांगलेचुंगले अन्न खाऊन धष्टपुष्ट होण्याचा असायला हवा; परंतु आजकाल ठाणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये नागरिकांकडून त्यांना शेव, गाठी, पाव, बिस्किटे इतर धान्य असे चारण्याचा प्रकार सर्रास घडताना दिसतो आहे. यामागे नागरिकांचा हेतू जरी चांगला असला तरी यामुळे पक्ष्यांचे नुकसान होते. कुतूहलापोटी, मनोरंजनाकरिता किंवा भूतदयेच्या कल्पनेमुळे जरी नागरिक पक्ष्यांना खाऊ घालत असले, तरी असे कृत्रिम अन्न त्यांना एकतर पचवता येत नाही किंवा त्यापासून त्यांच्या शरीराला धोका पोहोचतो. 

शरीराला जीवनावश्यक घटक न मिळाल्याने ते अनेक रोगांना सहजच बळी पडतात. कुरव पक्षी कळपात राहणारे असल्याने झपाट्याने अशा रोगांचा प्रादुर्भाव कळपातील इतर निरोगी पक्ष्यांमध्ये पसरू शकतो. जवळच्या शहरी पक्ष्यांमध्ये सुद्धा रोगाचे संक्रमण होण्याची शक्यता असते, असे जनजागृतीत सांगण्यात आले.

सामान्य नागरिकांनी आपल्या शहरातल्या स्थलांतरित पक्ष्यांच्या रूपाने आलेल्या परदेशी पाहुण्यांच्या आरोग्याच्या विशेष गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपली वागणूक ठेवावी. पक्ष्यांना तेलकट प्रक्रिया केलेले फूड खायला घालू नये, असे करणे हा दंडनीय अपराध आहे. 
    - रोहित जोशी, येऊर एन्व्हायर्नमेंटल     सोसायटी

आयत्या खाण्याच्या आमिषाने येणाऱ्या कुरव पक्ष्यांमध्ये खाद्य बळकावण्यासाठी झटापटी होतात. मासुंदा तलाव शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने इथे सतत वाहनांची वर्दळ असते. वाहनांच्या धडकेने अपघात होऊन कुरव पक्षी मृत झाल्याच्या घटना घडत आहेत. तरी नागरिकांनी जबाबदारीने वागावे. 
    - संगीता जाधव, मराठा जागृती मंच,     ठाणे

Web Title: Seagulls should not be played with by giving them artificial food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.