विवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 20:01 IST2018-12-13T19:59:29+5:302018-12-13T20:01:11+5:30

पत्नीसह तिघांना अटक : आधुनिक तंत्रज्ञानाने उलगडले हत्येचे गुढ

'Savitri' murder her husband in illegal affair | विवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून

विवाहबाह्य संबंधांतून ‘सावित्री’नेच केला पतीचा खून

अंबरनाथ : सहा महिन्यांपूर्वीच्या एका खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना अखेर यश मिळाले. शिरच्छेद केलेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागली. पत्नी सावित्रीच्या विवाहबाह्य संबंधांतून हे हत्याकांड झाल्याचे धक्कादायक वास्तव या प्रकरणाच्या तपासातून उघड झाले. 

10 एप्रिल 2018 रोजी अंबरनाथमधील महेंद्र नगर येथील टेकडीवर मुंडके नसलेला मृतदेह आढळला होता. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी मृतदेहापासून काही अंतरावर फेकलेले मुंडके शोधून काढले. मृतदेह कुजल्याने त्याची ओळख पटवणे अवघड जात होते. मृतदेहाच्या हातावर चांद हे नाव गोंदलेले होते. त्या नावावरुनही पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सहा महिने उलटूनही पोलिसांना यश आले नाही. 

सर्वत्र शोध घेऊनही यश येत नसल्याने साहायक पोलीस आयुक्त सुनील पाटील यांनी डॉ. हरिष पाठक यांची मदत घेतली. मृत व्यक्तीच्या चेहऱ्याच्या सांगाडय़ावरुन थ्री डायमेंशन तंत्रज्ञानाच्या आधारे संगणकावर काल्पनिक चेहरा तयार केला. या चेहऱ्याचा अंदाज घेऊन पोलिसांनी मृताचे चित्र रेखाटले. त्यानंतर तपासाला खऱ्या अर्थाने गती मिळाली. ज्या ठिकाणी मृतदेह सापडला होता, त्या ठिकाणापासून काही अंतरावर असलेल्या महेंद्रनगर भागातच अशी व्यक्ती राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी मृताचे सायन कोळीवाडा भागातील मूळ घर शोधून काढले. या भागात चौकशी केल्यानंतर त्याचे नाव बिंद्रेश प्रजापती असून, तो वाहन चालक असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी त्याची पत्नी सावित्री हिला विचारपूस केली असता, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. 


पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, सावित्रीचे त्याच भागातील किसनकुमार कनोजीया याच्यासोबत विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती उघड झाली. खात्री पटल्यावर पोलिसांनी सावित्री आणि किसनकुमार दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी पोलिसांजवळ खुनाची कबुली दिली. प्रेमसंबंधात सावित्रीला पतीचा अडसर नको होता. त्यामुळे त्याला संपविण्याचा कट त्यांनी रचला. त्यासाठी किसनकुमारने त्याचा मित्र राजेश यादव याची मदत घेतली. दोघांनी बिंद्रेशला दारू पाजण्याच्या बहाण्याने अंबरनाथ येथील महेंद्रनगर भागात नेले. तिथे दारू पाजून त्याची हत्या केली. ओळख पटू नये म्हणून बिंद्रेशचे मुंडके धडावेगळे करुन ते फेकण्यात आले.  अंबरनाथ पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून, त्यांना 18 डिसेंबर्पयत पोलीस कोठडी सुनावली आहे.  

Web Title: 'Savitri' murder her husband in illegal affair

टॅग्स :Murderखून