अधिकाऱ्यांशिवाय सरपंचाने उरकला लिलाव
By Admin | Updated: August 19, 2015 23:41 IST2015-08-19T23:41:36+5:302015-08-19T23:41:36+5:30
मुरबाड तालुक्यातील सरळगाव ग्रामपंचायत हद्दीतील व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या लिलावाला गटविकास अधिकाऱ्यांनी स्थगिती दिली

अधिकाऱ्यांशिवाय सरपंचाने उरकला लिलाव
मुरबाड : मुरबाड तालुक्यातील सरळगाव ग्रामपंचायत हद्दीतील व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या लिलावाला गटविकास अधिकाऱ्यांनी स्थगिती दिली असूनही सरळगाव सरपंचाने अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत मनमानी करत लिलाव केला आहे.
या गाळ्यांसाठी ज्या लोकांनी अनामत रक्कम भरली होती, त्याच लोकांनी या वेळी लिलावात सहभाग घेतला. त्यामुळे केवळ वीस ते बावीस लोकच उपस्थित होते. अवैधरित्या केलेल्या या लिलावाकडे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी मात्र, पाठ फिरवली.
या लिलावाबाबत मुरबाड पंचायत समिती कार्यालयात चौकशी केली असता गटविकास अधिकारी, सहा. गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी हे सगळे एकाचवेळी रजेवर गेल्याचे आढळले. तर तहसीलदार सर्जेराव म्हस्के - पाटील यांच्याशी संपर्क साधला असता अधिकाऱ्यांशिवाय लिलाव कसा होऊ शकतो?, तसा झाला असेलच तो अवैध असेल असे सांगून तहसीलदारांनी नागरिकांची तक्रारही दाखल करून घेतली.
आता मुख्य कार्यकारी अधिकारी या लिलावासंदर्भात काय भूमिका घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)