ठाणे जिल्ह्यासह राज्यभरात ‘सरपंच संवाद’; मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 18:20 IST2025-11-14T18:19:19+5:302025-11-14T18:20:36+5:30
जिल्हा परिषद ठाणे यांच्या कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यातील सरपंचांना प्रस्थापित केलेल्या कामाबद्दल राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वासमोर मते मांडण्याची अभूतपूर्व संधी डिजिटल, ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे उपलब्ध झाली आहे.

ठाणे जिल्ह्यासह राज्यभरात ‘सरपंच संवाद’; मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी
ठाणे : राज्यातील गावोगावी विकासाची नवी दृष्टी रुजवण्यासाठी राज्य शासनाने ‘सरपंच संवाद’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता ठाणे जिल्ह्यासह राज्यातील सर्व सरपंचांशी थेट संवाद साधणार आहेत. याबाबतचे निर्देश ठाणे जिल्हा परिषदेला शुक्रवारीच राज्य शासनाकडून प्राप्त झाले आहेत.
ठाणे जिल्ह्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यांनी आजपासून ‘सरपंच संवाद’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रमाची तयारी आदेशानुसार सुरू केली आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनाेज रानडे, यांनी स्वतः उपस्थित राहूनजिल्ह्यातील सर्व ४३१ ग्राम पंचायतींच्या सरपंचांपर्यंत माहिती पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. या संवादात सहभागासाठी क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (क्यूसीआय) शी सल्लामसलत करून प्रशिक्षण घेतलेल्या एक किंवा दोन सरपंचांची निवड करण्यात येणार आहे. त्यांना जिल्हा परिषद ठाणे यांच्या कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यातील सरपंचांना प्रस्थापित केलेल्या कामाबद्दल राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वासमोर मते मांडण्याची अभूतपूर्व संधी डिजिटल, ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे उपलब्ध झाली आहे.
या कार्यक्रमाच्या संरचनेनुसार ‘क्यूसीआय’द्वारे दिलेल्या सरपंच संवाद प्रशिक्षणाचा उद्देश आणि त्यातून ग्रामविकासात निर्माण होणाऱ्या सकारात्मक बदलांची चर्चा होणार आहे. राज्यातील सहा महसूल विभागांमधील निवडलेल्या सरपंचांचे एक ते दोन मिनिटांचे अभिप्राय मुख्यमंत्र्यांना थेट सादर केले जातील. ठाणे जिल्ह्यातील निवडलेल्या सरपंचांचे नाव क्यूसीआय मार्फत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.