नांदिवलीत रस्त्याची झाली दुरावस्था, डेब्रीज टाकून केली पायवाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 21:57 IST2019-07-16T21:54:40+5:302019-07-16T21:57:18+5:30
परिसरातील रहिवासी त्रस्त

नांदिवलीत रस्त्याची झाली दुरावस्था, डेब्रीज टाकून केली पायवाट
डोंबिवली: नांदिवली येथील श्री स्वामी समर्थ नगरमधील स्वामींच्या मठानजीकच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसात येथील रस्ता पाण्याखाली गेला असतांनाच आता तर त्या ठिकाणी चिखल, घाण जमा झाल्याने रहिवाश्यांची गैरसोय झाली आहे. या दुरावस्थेमधून बाहेर काढा अशी मागणी परिसरातील रहिवाश्यांनी केली.
इमारतीपर्यंत जाण्यासाठी रहिवाश्यांनी विविध ठिकाणी झालेल्या बांधकामांचे डेब्रीज टाकुन पायवाट केली आहे. तर काहींनी इमारतीसमोरच्या गेटबाहेर कोबा इमारतीत जाण्यासाठी रस्ता तयार केला आहे. त्यामुळे परिसरातील रस्त्याला ओबडधोबड पणा आला आहे. ज्या इमारतींसमोर, स्वामींच्या मठासमोर जेथे भराव टाकलेला नाही, तेथे घाण पाणी साचलेले आहे. त्याचा त्रास रहिवाश्यांना होत असून घाण पाण्यामुळे रोगराईची शक्यता आहे. पाणी साचल्यानंतर तेथे गाळ जमा झाला असून परिसरातच कच-याच्या बादल्या ठेवल्या जातात. त्या वेळेत उचलल्या नाहीतर डास, माशांचा प्रार्दुभाव होत असल्याने पादचारी त्रस्त आहेत. अशा स्थितीत त्या ठिकाणी महापालिकेने लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरत आहे. मे महिन्यात त्या ठिकाणी दगडमातीचा रस्ता तयार करण्यात आला, पण तो अर्धवट केल्याने ते काम करुन न केल्यासारखे झाले आहे. ते काम दर्जात्मक व्हावे अशी मागणी नागरिकांनी तेव्हाच केली होती. तसे असतांनाही काम मात्र झाले नाही. श्री स्वामी समर्थ मठाचे कार्यवाह सुरेंद्र खाचणे यांनी त्यावेळीच रस्त्याची रुंदी वाढवावी आणि सगळयांची सोय करावी अशी मागणी केली होती, परंतू ती मागणी कागदावरच राहील्याची खंत व्यक्त करण्यात आली. त्यामुळे आता तरी चांगला भराव टाकून नागरिकांची, भक्तांची गैरसोय टाळावी अशी अपेक्षा त्रस्त नागरिकांनी व्यक्त केली. तसेच चिखल, गाळ तातडीने उचलावा, जेथे पाणी साचले आहे तेथे जंतूनाशक फवारणी करावी, आणि डिडिटी पावडरची फवारणी करावी, धूर फवारणी क्वचीतच होते त्यात सातत्य हवे अशी मागणी करण्यात आली.