महापालिका आयुक्तांच्या रस्ते पाहणीनंतर उल्हासनगरातील रस्ते दुरुस्तीला वेग, निधीबाबत साशंकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 14:54 IST2025-10-18T14:53:45+5:302025-10-18T14:54:07+5:30
महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी रस्त्याच्या पाहणी दौऱ्यानंतर दिवाळी सणादरम्यान रस्ते दुरुस्तीला वेग आला.

महापालिका आयुक्तांच्या रस्ते पाहणीनंतर उल्हासनगरातील रस्ते दुरुस्तीला वेग, निधीबाबत साशंकता
उल्हासनगर : महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी रस्त्याच्या पाहणी दौऱ्यानंतर दिवाळी सणादरम्यान रस्ते दुरुस्तीला वेग आला. मात्र रस्ते दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया झाली का? याबाबत अधिकाऱ्यांनी मौन बाळगल्याने निधीबाबत साशंकता निर्माण झाली.
उल्हासनगरातील बहुतांश रस्ते खड्डेमय झाल्यावर भाजपा, शिंदेसेना, उद्धवसेना, मनसे, काँग्रेस पक्षांनी रस्त्यातील खड्ड्याला महापालिका आयुक्तांना जबाबदार धरले होते. आयुक्तांनी पावसाळ्यात रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी अडीच कोटीच्या निधीची तरतूद केली होती. तसेच रस्ते खोदणाऱ्या एमएमआरडीएसह राज्य सार्वजनिक, बांधकाम विभाग, भुयारी गटार ठेकेदार यांच्यासह अन्य जबाबदार ठेकेदाराना अर्धवट विकास कामे पूर्ण करण्यासाठी नोटीसा बजाविला होत्या. गेल्या आठवड्यात आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी रस्ता व चौकाची पाहणी करून रस्ता दुरुस्तीचे संकेत दिले होते. दिवाळी सणादरम्यान रस्ते दुरुस्ती सुरू केले असून रस्ते चकाचक दिसणार असल्याची प्रतिक्रिया आयुक्तांनी दिली.
निविदा प्रक्रिया विना रस्ते दुरुस्ती?
शहरातील रस्ते दूरुस्तीला वेग आला असून त्याचे श्रेय घेण्यासाठी राजकीय नेत्यात चढाओढ लागल्याचं चित्र शहरांत निर्माण झालं. राजकीय नेते, निवडणुकीतील इच्छुक उमेदवार रस्त्याच्या फोटोसह स्वतःचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीत आहे. मात्र रस्ता दुरूस्तीसाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली की, आवडत्या ठेकेदाराकडून रस्ता दुरुस्तीचे काम करून घेतले जाते. याबाबत महापालिका आयुक्तासह अधिकारी काहीएक बोलण्यास तयार नाहीत.
खोदलेल्या रस्त्याची यादी
शहरांत भुयारी गटार योजनेअंतर्गत खोदलेल्या रस्त्याची यादी महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी तयार केली. दिवाळीनंतर खोदलेल्या रस्त्याची निविदेतील अटी व शर्टीनुसार दुरुस्ती झाली का? याची पाहणी करून पुन्हा ठेकेदारकडून दुरुस्ती करून घेतली जाणार असल्याचे संकेत आयुक्तांनी दिले.