ठाणे जिल्ह्यात रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत; मुरबाडमध्ये मृत्यू; आरोग्य केंद्रे २४ तास सुरू
By सुरेश लोखंडे | Updated: August 19, 2025 08:57 IST2025-08-19T08:57:45+5:302025-08-19T08:57:57+5:30
अतिवृष्टीचा इशारा असल्याने आज पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर

ठाणे जिल्ह्यात रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत; मुरबाडमध्ये मृत्यू; आरोग्य केंद्रे २४ तास सुरू
सुरेश लाेखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर सोमवारी अधिकच वाढल्याने अनेक शहरांना फटका बसला. अनेक सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. घोडबंदर आणि नाशिककडे जाणारी रस्ते वाहतूक आणि उपनगरीय रेल्वे वाहतूक सोमवारी बाधित झाली. उल्हास नदीसह अनेक नदी-नाल्यांना पूर आला. पावसाचा जोर पाहून दुपारच्या सत्रातील शाळांना सुटी जाहीर केली व मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा असल्याने पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली.
जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला; पण सर्वाधिक १०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊसठाणे शहरात झाला. शहरी भागात पावसाचा अधिक जोर होता. कल्याण-नगर महामार्गावरील दुरुस्ती कामांमुळे वाहतूक ठप्प झाली असून, माळशेज घाटात वाढलेले धुके चालकांसाठी आव्हान ठरले. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना काळजी घेण्याचा सल्ला प्रशासनाने दिला. तसेच जिल्ह्यातील अतिवृष्टीचा आढावा घेण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साेमवारी ऑनलाइन बैठक घेतली.
मुरबाडमध्ये बुडून मृत्यू
संततधार पावसामुळे मुरबाड तालुक्यातील दूधनाेली येथील समीर संताेष राऊत (वय २५) या तरुणाचा पाडाळ येथील तलावात बुडून मृत्यू झाला, तर शहापूरमध्ये एक कच्चे घर कोसळले; मात्र जीवितहानी झाली नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आरोग्य केंद्रे २४ तास सुरू
जिल्हा आरोग्य विभागाने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, आरोग्य पथक व जि. प. दवाखाने २४ तास सुरू ठेवण्याचे आदेश दिले. पुरेशी औषधे, विशेषत: सर्प, विंचू, श्वान दंशासाठी लागणाऱ्या लस व औषधांचा साठा ठेवण्याचे आवाहन केले. याशिवाय पूरस्थितीत काही गावांचा संपर्क तुटू शकतो, असे लक्षात घेऊन गरोदर व स्तनदा मातांचे सुरक्षित स्थलांतर करण्यासाठी समन्वय साधण्याचे निर्देश दिले.