रितेश-जिया ठाणेकरांना देणार जोश, मॅरेथॉनला स्पर्धकांमध्ये जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 06:39 IST2022-12-03T06:39:00+5:302022-12-03T06:39:36+5:30
‘वेड’ या आगामी चित्रपटाचे मॅरेथॉनमध्ये करणार प्रमोशन

रितेश-जिया ठाणेकरांना देणार जोश, मॅरेथॉनला स्पर्धकांमध्ये जल्लोष
लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जल्लोष, आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात रविवारी पार पडणाऱ्या ‘लोकमत’ महामुंबई महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री जिया शंकर हे ठाण्यात येणार आहेत. वेड या त्यांच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन मॅरेथॉनमध्ये केले जाणार आहे.
रविवार, दि. ४ डिसेंबरला रेमंड ग्राऊंड येथून ‘लोकमत’ महामुंबई महामॅरेथॉनला सुरुवात होईल. धावपटूंचा उत्साह, आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी रितेश-जिया या महामॅरेथॉनला उपस्थित राहणार आहेत. २० वर्षे अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेते रितेश हे एका आगळ्यावेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ३० डिसेंबर रोजी त्यांचा ‘वेड’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः रितेश यांनी केले आहे. तसेच, या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जेनेलिया देशमुख या मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत. यापूर्वी जेनेलिया यांनी हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल पाच भाषिक चित्रपटांत काम केले आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे व अभिनेत्री जिया शंकर आदी कलाकार या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत तर गीते अजय-अतुल आणि गुरू ठाकूर यांनी लिहिली आहेत.