उल्हासनगर : उल्हासनगरात मराठी मतदारांत खास करून झोपडपट्टी परिसरात आमची ताकद मोठी आहे. त्या ताकदीचा विचार करता ७८ पैकी ३० जागा मिळाव्यात, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाने शिवसेनेकडे बुधवारी केली. भाजपाला बाजुला ठेवून महायुतीतील शिवसेना आणि रिपाइं या पक्षांनी पालिका निवडणुकीसाठी जागावाटप सुरू केले. त्यात ही मागणी करण्यात आली.या दोन्ही पक्षांची ही दुसरी बैठक होती. त्यात प्रत्येक परिसर आणि प्रभागानुसार चर्चा झाली. ओमी कलानी यांना पक्षात प्रवेश देऊन एकहाती सत्तेसाठी भाजपाचे प्रयत्न सुरू असतानाच शिवसेनेनेही ही पालिका हातातून जाऊ नये यासाठी कंबर कसली आहे. त्याचाच भाग म्हणून रिपाइंशी अंबरनाथच्या तोरणा विश्रामगृहावर बैठक झाली. तिला शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार बालाजी किणीकर, कल्याण उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडारे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, सुभाष मनसुलकर, धनजंय बोडारे, रिपाइंचे नेते बी. बी. मोरे, शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव, अरूण कांबळे, नाना बागुल, प्रदेश सचिव नाना पवार, नाना बिऱ्हाडे आदी उपस्थित होते. खासदार श्रीकांत शिंदे बैठकीच्या ठिकाणी भेट देऊन निघून गेले. बैठकीत ३० जागांची मागणी शिवसेनेकडे केल्याची माहिती रिपाइंचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी दिली.रिपाइंनी ३० जागांची मागणी केली असली, तरी ती कमी-जास्त होऊ शकते, असे चौधरी म्हणाले.
रिपाइंची शिवसेनेकडे ३० जागांची मागणी
By admin | Updated: October 13, 2016 03:52 IST