CoronaVirus News : कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये रिक्षांची वाहतूक पुन्हा सुसाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 00:58 IST2020-06-21T00:57:41+5:302020-06-21T00:58:06+5:30
दोघांची वाहने जप्त केल्याची माहिती आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांनी दिली.

CoronaVirus News : कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये रिक्षांची वाहतूक पुन्हा सुसाट
डोंबिवली : अनलॉकनंतर कल्याण-डोंबिवलीत रिक्षावाहतूक सुरू झाली असून, त्यातून केवळ दोन प्रवाशांना प्रवास करण्यास मुभा आहे. मात्र, प्रवासी तिसऱ्या प्रवाशाचे भाडे देण्यास तयार होत नसल्याने रिक्षाचालक तीन प्रवासी घेत असल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान, रिक्षेतून चौथा व पाचवा प्रवासी घेऊन जाणाºया १२ रिक्षाचालकांवर आतापर्यंत वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यात दोघांची वाहने जप्त केल्याची माहिती आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रिक्षेतून दोन प्रवासी घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, प्रवासी त्यास तयार होत नसल्याने रिक्षाचालक तीन प्रवासी घेत आहेत. त्यामुळे रिक्षाचालक तरी काय करणार, असा सवाल वाहतूक पोलिसांनी केला. याबाबत प्रवाशांना देखील विचारले असता ते म्हणाले की, ‘तिसºया प्रवाशांचे भाडे दोघांत शेअर करणे परवडणारे नाही, आधीच लॉकडाऊनमुळे वेतन कपातीला सामोरे जावे लागत असल्याने आर्थिक चणचण भेडसावत आहे. त्यामुळे पैसे जास्त जाण्यापेक्षा तिसरा प्रवासी सोबत आल्यास भाडे शेअर होते, कोणाला कात्री लागत नाही.’
दरम्यान, प्रवासी तयार असतील तर दोन सीट घेतो. अन्यथा तीन प्रवासी घ्यावे लागतात, असे रिक्षा चालकांनी सांगितले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा असे वारंवार सांगूनही नागरिक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहेत.