Rickshaw drivers refuse to meter down in Bhayander, arbitrary fare collection by passengers | भाईंदरमध्ये मीटरडाऊन करण्यास रिक्षा चालकांची नकारघंटा, प्रवाशांकडून केली जाते मनमानी भाडेवसुली

भाईंदरमध्ये मीटरडाऊन करण्यास रिक्षा चालकांची नकारघंटा, प्रवाशांकडून केली जाते मनमानी भाडेवसुली

मीरारोड - कायद्याने प्रवासी भाडे मीटर प्रमाणे नेणे बंधनकारक असून देखील भाईंदर मध्ये मात्र रिक्षाचालक सर्रास मीटर प्रमाणे भाडे नेण्यास मनाई करत मनमानी भाडे वसुली करत आहेत . किमान भाडे मीटर प्रमाणे १८ रुपये होत असताना रिक्षाचालक मात्र सर्रास ३० रुपये उकळतात . अश्याच प्रकारे अंतरा नुसार मनमानी शुल्क वसूल करून प्रवाश्यांची लूट चालवली असताना ह्या प्रकरणी ठोस कारवाई मात्र होत नसल्याने प्रवासी संतप्त आहेत . 

प्रवाश्याच्या रिक्षाचे भाडे हे मीटर प्रमाणे नेणे कायद्याने बंधनकारक आहे . परंतु भाईंदर पूर्व , पश्चिम आणि थेट उत्तन - चौक पर्यंतच्या परिसरात मात्र रिक्षा चालकांनी मीटर प्रमाणे भाडे नेण्याच्या नियमास वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत . मीटर प्रमाणे किमान भाडे १८ रुपये होत असताना रिक्षाचालक मात्र सर्रास ३० रुपये वसूल करतात . काहीजण तर थेट ४० ते ५० रुपये पण मागतात . 

मीटर प्रमाणे भाडे घेणे बंधनकारक असूनही भाईंदर मधील रिक्षा चालक मात्र मनमानीपणे प्रवाश्यांना मीटर प्रमाणे जाण्यास सरळ नकार देतात . भाईंदर मध्ये मीटर पद्धतच नाही असे सांगतात . त्यामुळे प्रवासी देखील वाद नको म्हणून नाईलाजाने मागेल ते भाडे देऊन प्रवास करतात . 

मीटर प्रमाणे रिक्षा चालवण्यास तयारी असल्याचे काही रिक्षा संघटनांचे पदाधिकारी सांगतात . तर काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा मीटर प्रमाणे रिक्षा चालवण्यास विरोध असल्याचे सांगितले जाते म्हणून मीटर प्रमाणे रिक्षा चालवल्या जात नाहीत असे सूत्र सांगतात . 

मीटर प्रमाणे भाईंदर मध्ये भाडे घेत नसल्याचे जगजाहीर असताना देखील आरटीओ, वाहतूक पोलीस आदीं कडून स्वतःहून ठोस कारवाई होताना दिसत नाही . राजकारणी आणि लोकप्रतिनिधी देखील या प्रश्नी आवाज काढत नाही . या मुळे ह्या मनमानी भाड्याच्या वसुली विरोधात नागरिक देखील हतबलता व्यक्त करून गप्प बसतात . आरटीओने भाईंदर मध्ये जे शेअर भाड्याचे मार्ग मंजूर केले आहेत त्या नुसार शेअर प्रवासी घ्या पण प्रवाशाने मीटर प्रमाणे सांगितल्यास त्यानुसार भाडे पण घ्या अशी नागरिकांची भूमिका आहे . 

शेअर भाड्यात देखील प्रवाश्यांवरच भुर्दंड 

भाईंदर मध्ये शेअर पद्धतीने आरटीओ ने काही मार्ग ठरवून दिले असले तरी त्या व्यतिरिक्त देखील शेअर रिक्षा चालवल्या जातात . त्यातच सध्या तर दोनच प्रवासी घेणे बंधनकारक असताना अनेक ठिकाणी जास्त प्रवासी घेतले जातातच शिवाय शेअर भाडे सुद्धा मनमानी आकारले जात आहे . भाईंदर वरून उत्तनला जाण्यासाठी ५० रुपये , काका बाप्टिस्टा चौक ४० रुपये , मोरवा २५  रु , मुर्धा - राई २० रु . प्रति प्रवासी शेअर भाडे घेतले जात आहे . तर किमान शेअर भाडे १० रुपये प्रति सीट असताना आता दोनच सीट घ्यायच्या नावाखाली प्रति प्रवाश्या कडून थेट १५ रुपये भाडे घेतले जात आहे . 

 

Web Title: Rickshaw drivers refuse to meter down in Bhayander, arbitrary fare collection by passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.