रिक्षाचालकांना करून देणार कर्तव्याची जाणीव
By Admin | Updated: September 20, 2015 00:02 IST2015-09-20T00:02:53+5:302015-09-20T00:02:53+5:30
प्रवाशांना सेवा देणे, हे रिक्षाचालकांचे आद्यकर्तव्य असतानासुद्धा नेमके तेच नाकारण्याचा प्रकार ठाण्यातील अनेक रिक्षाचालकांकडून सुरू आहे. जवळचे भाडे नाकारणे,

रिक्षाचालकांना करून देणार कर्तव्याची जाणीव
- अजित मांडके, ठाणे
प्रवाशांना सेवा देणे, हे रिक्षाचालकांचे आद्यकर्तव्य असतानासुद्धा नेमके तेच नाकारण्याचा प्रकार ठाण्यातील अनेक रिक्षाचालकांकडून सुरू आहे. जवळचे भाडे नाकारणे, रिक्षा रिकामी असतानासुद्धा प्रवासी नाकारणे, अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करणे यामुळे ठाणेकर प्रवासी मेटाकुटीला आले असून या रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी आणि त्यांना कर्तव्याची जाण करून देण्यासाठी आता ‘काहीतरी कर ठाणेकर’ या लोकमतच्या माध्यमातून सुरू असलेल्या चळवळीत त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
आजघडीला ठाण्यात ४५ हजारांहून अधिक रिक्षा आहेत. त्यातील २५ हजारांच्या आसपास अधिकृत रिक्षा आहेत, तर उर्वरित रिक्षा या अनधिकृत आहेत. असे असले तरी सध्या रिक्षाचालकांच्या अव्यावसायिक वर्तनामुळे ठाणेकर मेटाकुटीला आले आहेत. खासकरून, महिलावर्गाला यातील काही रिक्षाचालकांच्या या वर्तनाचा अधिक त्रास होतो आहे. ठाणे स्टेशन परिसरात रांगेत रिक्षा उभ्या असतानासुद्धा अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करण्यासाठी अनधिकृतपणे काही चालक रांगेच्या बाहेर रिक्ष उभ्या करून प्रवाशांना ताटकळत ठेवतात. परंतु, या रिक्षाचालकांकडे कोणाचेही लक्ष अद्याप गेलेले नाही. एवढे भाडे कशासाठी द्यायचे, असा सवाल केला तर, आपको आना है तो आओ, नही तो जाओ, असे उद्धटपणे बोलून ते चालक प्रवाशांनाच दमदाटी करू पाहत आहेत. काही वेळेस मीटर असतानादेखील ते खराब असल्याचे सांगून एखादा नवा प्रवासी भेटला तर त्याला ५० रुपयांऐवजी थेट १२० ते १५० रुपयांपर्यंत भाडे होईल, असे सांगून ते तेवढी रक्कम उकळतात. त्यातही सकाळ, दुपार अथवा संध्याकाळच्या ऐन गर्दीच्या वेळेस रिक्षाचालक प्रथम कुठे जायचे आहे, असा सवाल करून जर प्रवाशाने जवळचे भाडे सांगितले तर रिक्षाचालक ते भाडे नाकारत आहेत. ठाण्याच्या मध्यवर्ती भागात तर असे अनेक प्रकार रोज घडत आहेत.
रिक्षाचालकांच्या या लहरीपणाला आळा बसावा म्हणून ठाणे वाहतूक पोलिसांनी आणि ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत हेल्पलाइन नंबर दिले आहेत. या हेल्पलाइन क्रमांकावर रोज १० ते १२ तक्रारी प्राप्त होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. परंतु, दंड आकारण्याशिवाय इतर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने त्यांची मनमानी आणखीनच वाढली आहे.
मागील वर्षी एका मुजोर रिक्षाचालकाने स्वप्नाली लाड नामक मुलीला रिक्षात बसल्यानंतर अज्ञातस्थळी नेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तिने धाडस दाखवून चालत्या रिक्षातून उडी घेऊन आपली सुटका केली होती. सध्या तिची प्रकृती सुस्थितीत असली तरी या घटनेमुळे रात्रीच्या वेळेस एकट्यादुकट्या महिलेचा रिक्षाचा प्रवास त्रासदायक ठरू लागला आहे. त्यामुळेच अशा मूठभर रिक्षाचालकांमुळे सर्वांकडेच संशयाने पाहिले जात आहे. हे टाळण्यासाठी रिक्षा संघटनांनीही पोलिसांना त्या वेळी सहकार्य केले होते. तर, भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून ठाणे वाहतूक पोलिसांनी स्मार्टकार्ड ही संकल्पना पुढे आणली. या कार्डमध्ये रिक्षाचालकाची संपूर्ण माहिती दिली असून ते रिक्षामध्ये लावणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार, डिसेंबर ते आतापर्यंत ३२ हजार रिक्षांपैकी ३० हजार रिक्षांना हे स्मार्टकार्ड बसविल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त पी.व्ही. मठाधिकारी यांनी दिली.
आता रिक्षाचालकांना त्यांच्या कर्तव्याची जाण करून देण्यासाठी लोकमतने काहीतरी कर ठाणेकर... या माध्यमातून चळवळ उभी केली असून रिक्षाचालकांमध्ये कर्तव्याची जाण करून दे ठाणेकर... असे आवाहन केले आहे. तसेच रिक्षाचालकासंदर्भात कोणत्याही स्वरूपाची तक्रार असल्यास ९८६९४४८३९१ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर रिक्षाच्या नंबरप्लेटचा फोटो काढून पाठवा. आपल्या तक्रारीची दखल आम्ही घेऊ आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी, आम्ही आपली तक्रार रिक्षा युनियन तसेच वाहतूक पोलीस आणि ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठवू.