फडणवीसांबद्दल आदर, अखेर ते बॅनर खाली उतरवले; विक्रम प्रतापांकडून दिलगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 23:38 IST2022-07-07T23:37:06+5:302022-07-07T23:38:33+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत.

फडणवीसांबद्दल आदर, अखेर ते बॅनर खाली उतरवले; विक्रम प्रतापांकडून दिलगिरी
मीरारोड - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणाऱ्या जाहिरात फलकांवर फडणवीस ऐवजी फर्नांडिस असा उल्लेख केल्याने भाजपा कार्यकर्त्यांत नाराजी व्यक्त होत आहे. मीरा भाईंदर येथे हे बॅनर झळकले आहेत. मिरा-भाईंदरमधील नगरसेवक विक्रम प्रताप सिंह यांनी हे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार प्रताप सरनाईक यांचे समर्थक असलेले शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक विक्रम प्रताप सिंह यांच्या विक्रम प्रताप फाऊंडेशनच्या वतीने शहरात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना शुभेच्छा देणारे मोठमोठे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. मात्र, त्या फलकां मध्ये प्रसिद्ध मजकुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख चक्क देवेंद्र फर्नांडिस असा करण्यात आला आहे. त्यामुळे ह्या फलकांवरून शहरात चांगलीच उलटसुलट चर्चा रंगली आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी ह्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. तर फडणवीस चे फर्नाडिस केल्यावरून टीका होऊ लागल्याने विक्रम प्रताप यांनी ते लावलेले फलक काढून घेत एका पत्रकाद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच, प्रिंटिंग मिस्टेक झाल्याचे सांगत फडणवीस यांच्याबद्दल आदर व कौतुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.