ध्वनी आणि वायू प्रदूषणा मुळे त्रासलेल्या मीरारोडच्या रहिवाश्यांनी राजकारण्यांना प्रचारास येण्यावर बंदी
By धीरज परब | Updated: December 27, 2025 15:34 IST2025-12-27T15:32:05+5:302025-12-27T15:34:23+5:30
मीरारोडच्या पूनम विहार भागात बापा सीताराम मंदिर आणि सभागृह मागे इंद्रप्रस्थ ए, बी व सी आणि इंद्रप्रस्थ डी, इ, एफ, संस्कृती हि गृहसंकुले आहेत.

ध्वनी आणि वायू प्रदूषणा मुळे त्रासलेल्या मीरारोडच्या रहिवाश्यांनी राजकारण्यांना प्रचारास येण्यावर बंदी
धीरज परब/मीरारोड - नेहमीच्या ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषणाने त्रासलेल्या मीरारोडच्या पूनम विहार भागातील इंद्रप्रस्थ ह्या ३ विंगच्या इमारतीतील राहिवाश्यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी सोसायटीच्या आवारात येण्यास राजकारण्यांना बंदी घातली आहे. तसा फलकच प्रवेशद्वारावर लावला आहे.
मीरारोडच्या पूनम विहार भागात बापा सीताराम मंदिर आणि सभागृह मागे इंद्रप्रस्थ ए, बी व सी आणि इंद्रप्रस्थ डी, इ, एफ, संस्कृती हि गृहसंकुले आहेत. तर येथे एक हॉस्टेल पण आहे. येथील रहिवाशी गेल्या अनेक वर्षां पासून त्यांच्या येण्या - जाण्याच्या रस्त्यावर होणाऱ्या बेकायदा वाहन पार्किंगच्या समस्यांनी त्रासलेले आहेत. तर मंदिर मधून धार्मिक भजन, कीर्तन चालत होते तो पर्यंत ठीक होते. पण त्याठिकाणी अनधिकृत हॉल बनवून लग्न समारंभ व इत्तर कार्यक्रम सुरु केल्या पासून येथील रहिवाश्यांची झोप उडाली आहे.
लग्न व अन्य कार्यक्रम साठी भाडे कमावणारे स्वतःचे खिसे भरत आहेत मात्र या ठिकाणी रात्री - अपरात्री व पहाटे पर्यंत ध्वनिक्षेपक, बँड - वाध्ये वाजवून ध्वनी प्रदूषण कायदा आणि न्यायालयाच्या आदेशांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. सातत्याने चालणाऱ्या ध्वनी प्रदूषण मुळे रहिवाश्याना पुरेशी झोप मिळत नाही. अभ्यास करणाऱ्या विध्यार्थ्यांना तर नेहमीच ह्या ध्वनी प्रदूषणाचा जाच होऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येत नाही. वृद्ध, रुग्ण पासून सर्वानाच येथील हे ध्वनी प्रदूषण जाचक बनले आहे.
आधीच रस्त्यावरील सिमेंट - धूळ आदींनी वायू प्रदूषण फोफावले आहे. त्यात लग्न आदी समारंभ साठी दिवस - रात्री कधीही मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. आतषबाजी केली जाते. त्याच्या घातक धुराने वायू प्रदूषणाचा विळखा परिसराला पडला असून शुद्ध हवा मिळणे दुरापास्त झाले आहे. ध्वनी प्रदूषण बाबत रहिवाश्यांनी अनेकदा पोलिसांना तक्रारी केल्या आहेत. पोलीस येतात मात्र कायदेशीर ठोस कारवाई न करताच नावाला समज देऊन निघून जातात. त्यांचे देखील ह्या हॉल चालकांशी साटेलोटे असते. तर महापालिका देखील मंदिर व्यतिरिक्त झालेल्या हॉल आदी अनधिकृत बांधकामांना संरक्षण देत आली आहे. या भागातील भाजपाच्या माजी नगरसेवकाशी संबंधित हा हॉल असून त्यांना सातत्याने तक्रारी करून देखील समस्या सोडवल्या नसल्याचा संताप येथील लोकांनी बोलून दाखवला.
येथील इंद्रप्रस्थ ए, बी व सी सोसायटीतील रहिवाश्यांनी तर त्यांच्या प्रवेशद्वारावर निवडणूक प्रचारा करिता प्रवेश निषेध असा जाहीर फलकच लावून राजकारणी यांना निवडणूक प्रचारासाठी आत येण्यास मनाई केली आहे. सातत्याने होणाऱ्या ध्वनी आणि वायू प्रदूषणाच्या समस्ये मुळे निवडणूक प्रचार, राजकीय प्रचार - प्रसार साठी सोसायटीच्या आत कोणतीच परवानगी दिली जाणार नाही असा निर्णय इमारतीतील रहिवाश्यांनी घेतला असल्याचे फलकावर स्पष्ट केले आहे. सदर सोसायटीचे अध्यक्ष प्रवीणभाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लग्न आदी समारंभ मुळे ४ वर्षां पासून होणाऱ्या त्रासा बद्दल तक्रारी करून देखील काही होत नसल्याने हा निर्णय घेतल्याची माहिती दिली.
मीनाक्षी वाळणेकर ( अध्यक्ष - इंद्रप्रस्थ डी, इ, एफ सोसायटी ) - मंदिरात भजन - कीर्तन होते ते चांगले आहे. मात्र हॉल बांधून त्या ठिकाणी लग्न आदी कार्यक्रम मुळे आम्ही त्रासलो आहोत. रात्री - अपरात्री मोठ्या मोठ्याने आवाज केला जातो. फटाके फोडले जातात. पोलिसात तक्रारी करून पण त्रास कायम आहे. मध्यंतरी आम्ही सर्व महिलांनी जाऊन रोजच्या त्रासाला बद्दल जाब विचारत हे थांबवा अशी मागणी केली होती. आमच्या येण्या जाण्याच्या मार्गावर बाहेरील वाहनांचे अतिक्रमण झाले आहे. महिलांना चालायला मोकळे असायचे आता गाड्या उभ्या बेकायदा करतात.