The residents of the farmhouse for the former minister's farmhouse were killed | माजी मंत्र्यांच्या फार्महाउससाठी घातलेला बांध ग्रामस्थांनी पाडला
माजी मंत्र्यांच्या फार्महाउससाठी घातलेला बांध ग्रामस्थांनी पाडला

श्याम धुमाळ 

कसारा : नियम धाब्यावर बसवून शहापूर-मुरबाड हद्दीवरील ढाढरे आणि माळ परिसरांत एका माजी मंत्र्यांचे हजारो एकर जागेवर फार्महाउस आहे. या फार्महाउससाठी सातबाऱ्यावर वने अशी नोंद असलेल्या मालकीच्या टेकडीवर हजारो ब्रास उत्खनन करून काढलेल्या मातीपासून तयार केलेला बांधा नदीपात्रात टाकण्यात आला आहे. परिणामी कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली. यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी गुरूवारी जाऊन हा बंधारा पाडला. येत्या आठ दिवसांत संबंधितांवर कारवाई न झाल्यास पाटबंधारे विभागाविरोधात आंदोलन करू असा इशारा माजी सरपंच कान्हू मेंगाळ यांनी दिला आहे.

आदिवासी उपयोजनेमधून शेतकऱ्यांना सिंचनपुरवठा करण्यासाठी शासकीय योजनेमधून फार्महाउसला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. डोळखांब धरणातून पाणी उचलून या नदीपात्रात घातलेल्या बेकायदेशीर बांधपात्रात ते साठवले जाते. तिथूनच या फार्महाउसला पाणीपुरवठा करण्यात येतो. यामुळेशहापूर-मुरबाडच्या हद्दीवर असणाºया परंतु शहापूर तहसील अधिकार क्षेत्रात येणाºया ढाढरे, वाधाने, डोंगरवाडी, उंबरवाडी, नामपाडा, खरपत-१, खरपत-२, लाकूडपाडा आणि त्यापुढील गावांमध्ये भीषण कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी मिळावे, या उद्देशाने २००२ च्या दरम्यान जलसंपदा विभागाने या ठिकाणी सिमेंट बंधारा बांधला आहे. मालकीच्या जागेत पण सातबाºयावर वने अशी नोंद असलेल्या येथील टेकडीवर दरवर्षी लाखो ब्रास उत्खनन करून हा मातीचा बंधारा बांधला जातो.

गेली अनेक वर्षे हा प्रकार सुरू आहे. दरवर्षी उन्हाळा आला की, पाणी साठवण्यासाठी बंधारा बांधला जातो आणि पावसाळ्यात तो वाहून जातो. त्यामुळे दरवर्षी येथे हरित लवादाचे नियम धाब्यावर बसवून टेकडी फोडून लाखो ब्रास उत्खनन करून पर्यावरणाचा समतोल बिघडवण्याचे काम केले जात आहे. प्रशासकीय यंत्रणा कुठली कारवाई करते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
डोळखांब धरणाच्या कालव्याला पाडले भोक

शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या डोळखांब धरणाच्या सुरुवातीलाच कायमस्वरूपी मोरी टाकून एका व्यक्तीकडून त्या कालव्यात दगड, माती टाकून शेतकºयांना असलेले सिंचनाचे पाणी वळवले. हे पाणी थेट शाई नदीत घातलेल्या बांध क्षेत्रात अडवले जाते. ते बेकायदा फार्महाउससाठीच वळवले जाते. आम्ही लघुपाटबंधारे विभागाला याची वारंवार सूचना देत असतो. परंतु, दखल घेतली नाही, त्यामुळे यात लघुपाटबंधारेसुद्धा सहभागी असल्याचा आरोप माजी सरपंच कान्हू मेंगाळ यांनी केला आहे.

योजनेचा फार्महाउससाठी वापर
१९९७-९८ मध्ये शेतीच्या कामासाठी एकूण ११ शेतकºयांसाठी तयार करण्यात आलेल्या योजना या फार्महाउसच्या हिरवळ आणि फार्महाउसमधील म्हशी धुण्यासाठी इतर बांधकाम, वैयक्तिक कामासाठी या पाण्याचा वापर करण्यात येत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते हेमा पारधी यांनी दिली. यासंदर्भात फार्महाउसचे व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही लघुपाटबंधारेच्या परवानगीने हा बांध घातल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यामुळे गावात संतापाचे वातावरण पसरले आहे.

पेसांतर्गत आमची ग्रामपंचायत येते. कोणतेही उत्खनन करताना ग्रामपंचायतीची परवानगी घेणे आवश्यक असते. परंतु, या फार्महाउसधारकाने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता उत्खनन केले आहे. आदिवासी महिलांना पाणी न मिळाल्यास मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभारण्यात येईल. - हेमा पारधी, अध्यक्ष, ग्रामपंचायत पेसा समिती

आम्ही हा बांध घालण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही. तो बेकायदेशीर आहे. त्यामुळे यावर कारवाई करण्यात येईल.
- अनिल मेश्राम, उपअभियंता, लघुपाटबंधारे

ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही सर्वजण जाब विचारण्यासाठी गेलो असता, आम्ही कायदेशीररीत्या लघुपाटबंधारे विभागाकडून परवानगी घेऊन बांध घातल्याचे येथील व्यवस्थापकांनी सांगितले. या दोन दिवसांत जर हा बांध काढला नाही आणि येथील आदिवासी महिलांना पाण्याची सोय न झाल्यास आम्ही ढाढरे ग्रामपंचायतच्या वतीने लघुपाटबंधारेविरोधात उपोषण करणार आहोत. - मंगी पारधी, सरपंच, ढाढरे ग्रामपंचायत


Web Title: The residents of the farmhouse for the former minister's farmhouse were killed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.