भिवंडीत वीटभट्टीवरील ११ वेठबिगार मजुरांची सुटका!
By नितीन पंडित | Updated: December 27, 2023 18:43 IST2023-12-27T18:42:29+5:302023-12-27T18:43:59+5:30
श्रमजीवीचे विवेक पंडित यांचा पुढाकार .

भिवंडीत वीटभट्टीवरील ११ वेठबिगार मजुरांची सुटका!
भिवंडी: तालुक्यातील चिंबीपाडा परिसरात वीटभट्टी मालकाने आदिवासी मजुरांना आपल्या वीटभट्टीवर विठबिगरी म्हणून ठेऊन त्यांची आर्थिक पिळवणूक केल्याचा प्रकार श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी उघडकीस आणला असून याप्रकरणी वीटभट्टी मालकाविरोधात भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिंबिपाडा येथे सिद्दीकी शेख यांची वीटभट्टी असून त्या ठिकाणी मंजू संतोष पवार तिचा पती संतोष पवार,मुलगा संदीप,सुनील व वडील लक्ष्मण सवरा हे मागील ८ वर्षां पासून वीटभट्टीवर मजुरी करीत आहेत.त्यासाठी ५ हजार रुपये बयाणा देऊन कामावर घेऊन गेला.त्यांनतर आठवड्याला फक्त ८०० रुपये इतका कमी मोबदला देऊन राबवून घेत होता.तर इतरत्र कामावर जाण्यास वीटभट्टी मालकाला सांगितल्यावर तुमचे पैसे अजून फिटले नाहीत असे धमकावून काम करून घेत असताना त्यांना मारहाण व शिवीगाळ सुद्धा करीत असे.
याबाबत मंजू संतोष पवार हिने गावातील श्रमजीवी संघटनेच्या अलका भोईर यांना माहिती दिली.त्यांनतर संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर, जिल्हाध्यक्ष अशोक सापटे यांना दिली. त्यांनी संस्थापक विवेक पंडित यांना याबाबत कल्पना देताच पंडितांनी मंगळवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास वीटभट्टीवर धाव घेत पाहणी केली. त्या ठिकाणी मंजू संतोष पवार हिच्यासह मंजी लक्ष्मण सवरा वय ३५ गंजाड ता.डहाणू,सुनिता लक्ष्मण वाघे वय ३५ धावड पाडा वज्रेश्वरी ता.भिवंडी,संगीता सदू नडगा वय ४२ जामसर जव्हार,नामदेव अर्जुन वाघे वय ६५ ब्रह्मण पाडा,मनीषा झिपर सवरा वय ५५ टेंभवली ,सविता पारधी वय ३५ नानिवली ता.पालघर,सुनिता सुकऱ्या घाटाळ वय ४५ बोईसर,दिपाली सुरेश पवार वय ३० दलेपाडा पडघा,मंदा रमेश हडळ वय ४० डहाणू,लक्ष्मी झिपर सवरा वय १५ शिलोत्तर,सुनील संतोष भोई वय १८ चाविंद्रा हे वेठबिगार म्हणून काम करीत असल्याचे आढळून आले.
याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात मंजू संतोष पवार यांनी दिलेल्या तक्रारी वरून वीटभट्टी मालक सिद्दीकी शेख याच्याविरोधात अट्रोसिटी सह विठबिगरी कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून विवेक पंडित यांनी तहसीलदार अधिक पाटील यांची भेट घेऊन त्यांना तात्काळ वेठबिगार मुक्तीचे प्रमाणपत्र दिले आहेत.पोलिस फरार वीटभट्टी मालकाचा शोध घेत आहेत.
देशाला स्वतंत्र मिळून ७६ वर्षे झाली तरीही मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आदिवासी कातकरी समाजातील मजुरांची पिळवणूक होत आहे हे दुर्दैवी असून अशा मालकांविरोधात कठोर कारवाई करून या मजुरांचे पुनर्वसन करण्याची मागणी विवेक पंडित यांनी केली आहे.