दोन हजारांच्या नोटांना पतसंस्थांचा नकार; महामुंबईत गर्दी नाही, फारशा नोटा नसल्याचा ग्राहकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 09:02 AM2023-05-24T09:02:27+5:302023-05-24T09:03:25+5:30

आधीच्या नोटाबंदीत चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने अनेक ठिकाणी पतसंस्थांनी या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याचे दिसून आले. 

Rejection of Rs 2000 notes by patsanstha; Customers claim that there is no rush in Greater Mumbai, there are not many notes | दोन हजारांच्या नोटांना पतसंस्थांचा नकार; महामुंबईत गर्दी नाही, फारशा नोटा नसल्याचा ग्राहकांचा दावा

दोन हजारांच्या नोटांना पतसंस्थांचा नकार; महामुंबईत गर्दी नाही, फारशा नोटा नसल्याचा ग्राहकांचा दावा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : दोन हजारांच्या नोटा बदलून घेण्याची सुरुवात मंगळवारपासून झाली असली तरी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगडमधील बँकांमध्ये त्यासाठी अजिबात गर्दी झाली नाही. 

आमच्याकडे फारशा नोटाच नसल्याचा ग्राहकांचा दावा होता आणि नोटा बदलून घेण्यासाठी पुरेसा वेळ दिल्यानेही गर्दी नसल्याचे बँक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. आधीच्या नोटाबंदीत चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने अनेक ठिकाणी पतसंस्थांनी या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याचे दिसून आले. 

ठाणेकर निवांत
ठाणे जिल्ह्यातील बँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी २०१६ मध्ये जशा रांगा लागल्या होत्या, तसे चित्र आता नाही. ठाणे शहरातील बँकांत सुमारे ५० ग्राहकांनी दिवसभरात नोटा जमा केल्या. डोंबिवली व कल्याणमध्ये तर तेवढ्या संख्येनेही ग्राहक बँकेत नव्हते. बँकांनी ज्येष्ठांसाठी वेगळा कक्ष केला आहे. संख्या पाहून मंडप घालण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले असले, तरी बहुतांश बँकांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही.

पतसंस्थांचा नकार
रायगड जिल्ह्यातील बँकांतही फारशी गर्दी नव्हती. मात्र, यापूर्वीच्या नोटाबंदीत पतसंस्थांना चौकशीला सामोरे जावे लागल्याने तेथे या नोटा स्वीकारल्या जात नसल्याचे दिसून आले. पतसंस्थांच्या महासंघाने मात्र नोटा स्वीकारा; पण त्याचा तपशील ठेवावा, असे पत्रक काढले आहे.

नवी मुंबईत आलबेल
नोटा बदलण्यासाठी पुरावे मागण्यात येत नसल्याने नवी मुंबईत कोठेही अवास्तव गर्दी नाही. शिवाय दुकाने, हॉटेलमध्येही २००० ची नोट स्वीकारण्यात येत आहे. पेट्रोल पंप आणि काही बारमध्ये अशा नोटा देणाऱ्यांचे प्रमाण किरकोळ स्वरूपात वाढले आहे.

पालघरमध्ये गर्दी नाही
नोटा बदलण्याच्या पहिल्या दिवशी वसई-विरारसह पालघर जिल्ह्यात दुपारपर्यंत अल्प प्रतिसाद होता. कुठेही रांगा दिसून आल्या नाहीत.

Web Title: Rejection of Rs 2000 notes by patsanstha; Customers claim that there is no rush in Greater Mumbai, there are not many notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.