Raj Thackeray mns worker order; 'nothing to do that people will hurt' | राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश; 'लोकांना त्रास होईल असं काहीही करू नका!'

राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश; 'लोकांना त्रास होईल असं काहीही करू नका!'

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य ईडीच्या चौकशीमुळे मुंबई आणि ठाण्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. 22 ऑगस्टला राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलवल्यास ठाणे बंद करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला होता. परंतु आता मनसेनं ठाणे बंदचं आवाहन मागे घेतलं आहे. मनसे अध्यक्ष राज यांनी लोकांना त्रास होईल असे काही करू नका, असे सांगितल्यामुळे त्यांच्या आदेशानुसार आम्ही बंद पाठी घेत आहोत. त्यांना चौकशीची नोटीस पाठविल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष होता आणि त्या तीव्र भावनेने आम्ही सरकार विरोधी ठाणे बंदचा इशारा दिला होता. पण त्या दिवशी आम्ही काय करणार आहोत  याचा निर्णय मात्र आदल्या दिवशी घेतला जाईल. आज मात्र आम्ही बंद पाठी घेत आहोत, असे अविनाश जाधव यांनी लोकमतला सांगितले आहे. 

कोहिनूर मिल व्यवहारप्रकरणी राज ठाकरेंना ईडीने नोटीस बजावल्यानं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय. २२ ऑगस्टला राज ठाकरेंना ईडीपुढे हजर राहायचं आहे. राज ठाकरेंवर प्रेम करणारे कार्यकर्ते त्या दिवशी उत्स्फूर्तपणे बाहेर पडतील, त्यामुळे काय घडेल सांगता येत नाही, असं सूचक विधान मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी केलंय. अतिमहत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा, असंही त्यांनी म्हटलंय. परंतु, जनतेला वेठीस न ठरण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी मनसेला दिला आहे. त्यानंतर राज ठाकरेंनीही जनतेला त्रास होईल,असं न वागण्याचा मनसे कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे.

दुसरीकडे राज ठाकरेंना ईडीची नोटीस आलीय, या संदर्भात तुम्हाला जेवढी माहिती आहे, तेवढीच मला आहे. कारण, ईडीचं काम स्वतंत्रपणे सुरू असतं. त्यांच्याशी आमचा संबंध नाही. त्यामुळे राज यांना नेमकी कशासाठी नोटीस आलीय याबद्दल मी अनभिज्ञ आहे. ईडीच्या चौकश्या सुरूच असतात. त्यात सूडबुद्धीचा संबंध कुठे आला? चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी मनसेचा आरोप फेटाळून लावला आहे. मात्र, येत्या काळात या विषयावरून बरीच चकमक होण्याची चिन्हं आहेत.

Web Title: Raj Thackeray mns worker order; 'nothing to do that people will hurt'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.