Raj Thackeray: अखेर राज ठाकरेंच्या सभेचं ठिकाण बदललं; मनसेची उत्तरपूजा होणारच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 14:43 IST2022-04-07T14:41:40+5:302022-04-07T14:43:05+5:30
गडकरी रंगायतन नाट्यगृहाजवळील मुस चौकात महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा जाहीर घेण्यासाठी मनसेच्या स्थानिक नेत्यांनी पोलिसांना अर्ज दिला होता

Raj Thackeray: अखेर राज ठाकरेंच्या सभेचं ठिकाण बदललं; मनसेची उत्तरपूजा होणारच
ठाणे : गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे आणि मदरशा संदर्भात केलेल्या वक्तव्यावर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टिका केली होती. त्यानंतर आता येत्या ९ एप्रिल रोजी ठाण्यात मनसेच्या माध्यमातून राज ठाकरेंची सभा आयोजित करण्यात आली आहे. डॉ. मुस रोड येथे मनसे पदाधिकाऱ्यांनी सभेचे ठिकाण अंतिम केले होते. मात्र, पोलिसांनी येथे परवानगी नाकारल्याने आता मनसेने देखील एक पाऊल मागे येत मुस रोडपासून जवळ असलेल्या गजानन महाराज चौकात आता सभा आयोजित केली आहे.
गडकरी रंगायतन नाट्यगृहाजवळील मुस चौकात महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा जाहीर घेण्यासाठी मनसेच्या स्थानिक नेत्यांनी पोलिसांना अर्ज दिला होता. त्यानंतर नितीन सरदेसाई यांनी या जागेची पाहणीदेखील केली होती. दरम्यान याच दिवशी हिंदीभाषा एकता परिषद आणि राजस्थानी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी ७.३० वाजता गडकरी रंगायतनमध्ये २८ व्या राष्ट्रीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृह निर्माण विभागाचे पोलिस महासंचालक विवेक फणसाळकर यांच्यासह आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पोलिसांना येथे पोलिस बंदोबस्त तैनात ठेवावा लागणार आहे. याशिवाय, सभेमुळे परिसरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे पोलिसांनी सभेसाठी मुस चौकाऐवजी शहरातील हायलॅन्ड मैदान व काशिनाथ घाणोकर नाटय़गृह हे दोन पर्याय सुचविले होते. परंतु डॉ. मुस रोड येथेच सभा घेतली जाईल, असा चंग मनसेने बांधला होता.
पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर हायलॅन्ड आणि घाणोकर नाट्यगृह न करता गजानन महाराज चौक रस्ता सभेसाठी मिळावा अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे केली होती. अखेर या रस्त्यावर सभा घेण्यासाठी पोलिसांनी मंजुरी दिल्याची माहिती मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली आहे. त्यामुळे आता येत्या 9 एप्रिल रोजी राज ठाकरे विरोधकांचा या सभेच्या निमित्ताने समाचार घेणार असून या सभेला उत्तरपुजा असे नाव देण्यात आले आहे.