फेरीवाल्यांकडून रेल्वेला दोन हजार कोटींचा हप्ता मिळतो - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 05:53 IST2017-10-27T18:44:24+5:302017-10-28T05:53:59+5:30

गुजरातमध्ये भाजपाने 150 हून अधिक जागा जिंकल्यास ईव्हीएम मशीनचा वाटा सर्वात मोठा असेल असे राज म्हणाले. 

Railways get Rs 2 thousand crore from hawkers - Raj Thackeray | फेरीवाल्यांकडून रेल्वेला दोन हजार कोटींचा हप्ता मिळतो - राज ठाकरे

फेरीवाल्यांकडून रेल्वेला दोन हजार कोटींचा हप्ता मिळतो - राज ठाकरे

ठळक मुद्देफेरीवाल्यांकडून प्रशासनाला 2 हजार कोटींचा हप्ता मिळतो असा आरोपही त्यांनी केला. . देशाची अर्थव्यवस्था गर्भगळीत झालीय. जीएसटी, नोटाबंदीची काय गरज होती ?

डोंबिवली : फेरीवाल्यांना हटवा, असे मी सातत्याने सांगत होतो. पण माझ्या मनसेच्या मुलांनी ते करून दाखवल्यावर प्रशासनाला जाग आली आणि एका दिवसात स्टेशन परिसर मोकळे होऊ शकतात, हे दिसून आले. पण फेरीवाले हटवण्याची सत्ताधारी पक्षाची इच्छाच नाही. कारण त्यांच्याकडून वर्षाला दोन हजार कोटींचा हप्ता मिळतो. फेरीवाले हटवण्यासाठी ३० आॅक्टोबरची मुदत दिली आहे, ती पाळली नाही तर पुन्हा आमचा इंगा आम्ही दाखवू, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी येथे दिला.
कल्याण-डोेंबिवलीतील मनसेचे पदाधिकारी, नागरिकांसोबतच्या संवादानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तुम्ही हटवल्यानंतर पुन्हा फेरीवाले बसल्याचा मुद्दा लक्षात आणून दिल्यावर तुम्ही मुख्यमंत्र्यांना, सत्ताधा-यांना जाब विचारायला हवा. मनसेच्या आंदोलनानंतर फेरीवाले हटले. नागरिकांना मोकळे रस्ते मिळाले. गर्दी कमी झाली. असे असताना त्याचे श्रेय मनसेला न देता फेरीवाले पुन्हा येऊन बसल्याचे प्रश्न मला का विचारता, असा उलट सवाल त्यांनी केला. फेरीवाले हटविणे हे सत्ताधारी पक्षाचे काम आहे. पण त्यांच्यात इच्छाशक्तीच नाही. सत्ताधाºयांची काही जबाबदारी आहे की नाही, असा सवाल त्यांनी केला.
सरकारच्या ‘अच्छे दिना’ची खिल्ली उडवून गुजरातमध्ये भाजपापेक्षा काँग्रेसला ‘अच्छे दिन’ असल्याचा दावा त्यांनी केला. मोदींच्या २०१४ मधील विजयात राहुल गांधींचा ५० टक्के, सोशल मीडिया व मीडियाचा २५ टक्के, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा १० टक्के आणि उरलेला सहभाग मोदींचा आहे. पण आता त्यांच्या भाषणातून गर्दी उठून जाते याकडे त्यांनी लक्ष वेधले. मोदी आणि भाजपाच्या आहारी गेल्याबद्दल त्यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. परप्रांतीयांचे वाढलेले लोंढे, बांगलादेशींचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला, जेव्हा हे लोंढे अंगावर येतील तेव्हा तुम्हाला आमची आठवण येईल, असा दावा त्यांनी केला. सोशल मीडियावर निर्बंध घालण्याच्या भाजपाच्या पावित्र्यावर त्यांनी टीका केली, या मीडियाचा तुम्हाला फायदा होत होता, तेव्हा तुम्ही त्याला पाठिंबा दिला आता बंदीची भाषा करता? भाजपाला टीका सहन होत नाही, असा चिमटा त्यांनी काढला.
>‘वांद्रे येथील आग लावलेली’
मुंबईत वांद्रे येथील आग ही कच्ची बांधकामे पक्की करण्यासाठी लावलेली होती, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. बांगलादेशी व मोहल्ले वाढवून हिंदुत्वाच्या पोकळ बाता करायच्या, अशी टीका त्यांनी भाजपा, शिवसेनेचे नाव न घेता केली. यांच्याच काळात हे मोहल्ले वाढले. पण प्रत्येक गोष्ट करताना मतदान म्हणून त्याकडे बघायचे आणि निवडणुकीत मते मागण्यासाठी हिंदुत्वाचा आधार घ्यायचा, ही लाजीरवाणी बाब आहे, अशी टीका त्यांनी केली.

Web Title: Railways get Rs 2 thousand crore from hawkers - Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.