Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 21:18 IST2025-11-03T21:17:01+5:302025-11-03T21:18:02+5:30
Central railway Accident News: मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ अपघात होऊन चार लोकांचा मृत्यू झाला होता, तर ९ लोक जखमी झाले होते.

Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
Mumbra Railway Accident: पाच महिन्यानंतर मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ९ जून २०२५ रोजी झालेल्या मुंबई लोकल रेल्वे अपघातात चार लोकांचा मृत्यू झाला होता, तर ९ लोक जखमी झाले होते. या अपघाताचा दोन रेल्वे इंजिनिअरवर ठपका ठेवण्यात आला असून, रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे रेल्वे पोलिसांनी मध्य रेल्वेच्या सीनियर सेक्शन इंजिनिअर आणि सेक्शन इंजिनियरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रेल्वेचे अधिकारी म्हणाले, "मुंब्रा रेल्वे स्थानक अपघात प्रकरणाचा तपास केल्यानंतर ठाणे पोलिसांनी वरिष्ठ इंजिनिअर आणि कनिष्ठ इंजिनिअरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपघातातील मृत्यू प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे."
भारतीय न्याय संहितेतील कलम २५ नुसार (दुसऱ्यांच्या जीवितास किंवा वैयक्तिक सुरक्षिततेस धोका निर्माण करणारे कृत्य) हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कसा झाला होता अपघात?
रेल्वे विभागाचे आयजी हेमंत कुमार यांनी त्यावेळी माहितीनुसार, 'मुंब्रा रेल्वे स्टेशनजवळ तीव्र वळण आहे. ज्यावेळी अपघात झाला, त्यावेळी रेल्वेचा वेग जवळपास प्रतितास १०० किमी इतका होता. वेग आणि तीव्र वळण असल्याने दारावर लटकलेले लोक खाली पडले होते.'
रेल्वेच्या दारात लटकलेल्या आणि खाली पडलेल्या प्रवाशांपैकी ४ जणांचा मृत्यू झाला होता. तर ९ जखमी झाले होते. या अपघातानंतर लोकल रेल्वे गाड्यांना स्वयंचलित दरवाजे लावण्याच्या प्रक्रियेला वेग आला.