राहूल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा धडकणार ठाण्यात; जोरदार तयारी

By अजित मांडके | Updated: February 29, 2024 16:15 IST2024-02-29T16:15:05+5:302024-02-29T16:15:44+5:30

ठाणे जिल्हा हा पूर्वी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. येथूनच खासदार, आमदार, महापौर कॉंग्रेसचे झाले आहेत.

Rahul Gandhi's Bharat Jodo Nyaya Yatra will be held in Thane | राहूल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा धडकणार ठाण्यात; जोरदार तयारी

राहूल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा धडकणार ठाण्यात; जोरदार तयारी

ठाणे : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची दुसºया टप्यातील भारत जोडो न्याय यात्रा आता मार्च महिन्यात ठाण्यात धडकणार आहे. त्यासाठी कॉंग्रेसकडून जोरदार तयार सुरु झाली असून त्याचे नियोजन देखील आखले जात आहे. ठाण्यातील विविध भागांतून ही न्याय यात्रा जाणार असल्याची माहिती कॉंग्रेसच्या वरीष्ठ सुत्रांनी दिली. विशेष म्हणजे राहुल गांधी या यात्रेच्या निमित्ताने प्रथमच ठाण्यात येत आहेत.

ठाणे जिल्हा हा पूर्वी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. येथूनच खासदार, आमदार, महापौर कॉंग्रेसचे झाले आहेत. परंतु मागील काही वर्षात ठाण्यासह जिल्ह्यात कॉंग्रेस पिछाडीवर गेल्याचे दिसून आले आहे. ठाणे महापालिकेत देखील कॉंग्रेसचे इनमीन तीन नगरसेवक आहेत. तर जिल्ह्यातही कॉंग्रेसची स्थिती फारशी चांगली नसल्याचे चित्र आहे. परंतु आता राहुल गांधी यांच्या निमित्ताने ठाणे कॉंग्रेसला उभारी मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. भाजपला रोखण्यासाठी राहुल यांनी संपूर्ण भारतात भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. पहिल्या टप्यातील या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता दुसºया टप्यात ही यात्रा पुन्हा जोमाने सुरु झाली आहे. त्यानुसार आता ठाण्यात राहूल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा येत्या १२ मार्च रोजी ठाण्यात धडकणार असल्याची माहिती कॉंग्रेसच्या सुत्रांनी दिली. त्यानुसार या संदर्भात बुधवारी या यात्रेचे नियोजन करण्यासाठी बैठक देखील झाली आहे. ही यात्रा ठाण्यातील कोण कोणत्या भागातून नेणे अपेक्षित आहे, त्याचेही नियोजन आखण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यानुसार ठाण्यातील कळवा, खारेगाव, शहरी भाग, कॅडबरी, रेमंड आदी भागातून ही यात्रा घोडबंदर मार्गे पुढे जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.

यापूर्वी गांधी घराण्यातील इंदिरा गांधी यांनी साधारणपणे १९७६ - ७७ च्या आसपास ठाण्यात हजेरी लावली होती. त्यानंतर १९८० च्या सुमारास राजीव गांधी यांनी देखील आमदारकीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्ताने ठाण्यात हजेरी लावली होती. त्यानंतर गांधी घराण्यातील एकही व्यक्ती ठाण्यात आलेला नाही. राहुल गांधी हे कोर्ट केस निमित्ताने भिवंडीला येऊन गेले आहेत. परंतु ठाण्यात ते प्रथमच येत आहेत. त्यामुळे याची उत्सुकता देखील कॉंग्रेस पदाधिकाºयांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहे.

Web Title: Rahul Gandhi's Bharat Jodo Nyaya Yatra will be held in Thane