Purchase of medical equipment at low cost, claims Thane Municipal Corporation | कमी किमतीत केली वैद्यकीय साहित्याची खरेदी, ठाणे महापालिकेचा दावा

कमी किमतीत केली वैद्यकीय साहित्याची खरेदी, ठाणे महापालिकेचा दावा

ठाणे - मागील काही महिन्यांपासून महापालिकेकडून कोरोनाकाळात वैद्यकीय साहित्य महागड्या दरात विकत घेतल्याची टीका केली जात आहे. परंतु, मनपाने राज्य शासनाने काढलेल्या नव्या अध्यादेशामध्ये ज्या किमतींना साहित्यखरेदी सांगितली आहे, त्यापेक्षा कमी किमतीत खरेदी केली असल्याची माहिती पुढे आली आहे. आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तीन महिन्यांपूर्वी पालिकेने हे साहित्य कमी किमतीत खरेदी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये एन-९५ मास्क असतील किंवा थ्री-लेअरचे मास्क असतील किंवा पीपीई किट असेल, या सर्वच वस्तू कमी किमतीत खरेदी केल्या असल्याचा दावा केला आहे.

कोरोनाकाळात वैद्यकीय अत्यावश्यक साहित्यखरेदी करण्यावरूनही पालिका अडचणीत आली होती. भाजपने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. परंतु, आता शासनाच्या दरापेक्षाही कमी किमतीत साहित्यखरेदी केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

विशेष म्हणजे राज्य शासनाचा अध्यादेश २० ऑक्टोबरच्या अध्यादेशापूर्वी तीन महिने आधीच या साहित्याची खरेदी कमी किमतीत केली आहे. शासनाने एन-९५ मास्कची किंमत २८ रुपये निश्चित केली आहे. ठामपाने ते २७.६० रुपयांना, तर थ्री-लेअर मास्कची किंमत चार रुपये असताना ते मास्क २.१८ रुपयांना खरेदी केले आहेत. पीपीई किटची खरेदीही २८२.५० रुपयांना केली आहे. बाजारात याची किंमत ३५० रुपयांंपासून पुढे आहे. तर, बाजारात थर्मल गन १२०० ते २००० रुपयांंपर्यंत मिळत असताना पालिकेने ती ७८८.४० रुपये आणि ऑक्सिमीटरची बाजारात ८०० ते १२०० रुपये किंंमत असताना ते ४४६.८८ रुपयांना खरेदी केले आहे.

शासनाने आता किमती निश्चित केल्या आहेत. परंतु, ठाणे महापालिकेने तीन महिन्यांंपूर्वीच त्या साहित्याची कमी किमतीत खरेदी केली आहे. तसेच आतादेखील निविदा काढली आहे. ती खरेदी आणखी कमी किमतीत आम्ही करू, असा आमचा प्रयत्न आहे. - गणेश देशमुख,
अतिरिक्त आयुक्त, ठामपा 

जेवणावळीचे बिल नियमानुसारच - ठामपा आयुक्त  
ठाणे : कोरोनाच्या आपत्तीत एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यात केवळ १०० ते ३१० रुग्णसंख्या असताना दररोज ८०० माणसांच्या जेवणावळीचे बिल काढल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी केला होता. परंतु, पालिकेने जी बिले काढली आहेत, ती नियमानुसारच असल्याचा दावा मनपा आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केला आहे. आयसीएमआरच्या निर्देशानुसारच प्रत्येक रुग्णामागे किती स्टाफ गरजेचा असतो, त्याची माहिती आरोप करणाऱ्या नगरसेवकांना माहीत नसावी, असेही त्यांनी सांगितले. 
शहरात मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून क्वारंटाइन सेंटर उभारण्यास सुरुवात झाली होती. या केंद्रांतील रुग्ण व कर्मचाऱ्यांना चहा, नाश्ता, दोन्ही वेळचे जेवण पुरविण्यासाठी २८० रुपयांचे पॅकेज मंजूर केले होते. मनपा हद्दीत १५ एप्रिलला रुग्णांची संख्या ११० होती, तर ३० एप्रिलला ती ३१० पर्यंत पोहोचली होती. मात्र, १५ ते ३० एप्रिल या काळात क्वारंटाइन केंद्रांतील रुग्ण, वैद्यकीय व मनपातील कर्मचारी आदी सुमारे ८०० जणांना जेवण दिल्याचे बिल आकारले आहे. यापोटी मनपाने ३३ लाख ६५ हजारांचे बिल मंजूर केले असल्याचा आरोप पवार यांनी केला होता. परंतु, नगरसेवकांनी आरोप करताना केवळ रुग्णच धरले आहेत. परंतु, त्यांची सेवा करण्यासाठी प्रत्येक रुग्णामागे स्टाफची संख्या किती असावी लागते, त्याचाच हा खर्च लावल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  

दुधाचाही समावेश
ठाणे महापालिकेकडून एका जेवणाच्या ताटामागे २८० रुपये आकारले जात आहेत. हा दर कमी असून यामध्ये तर रुग्णांना दूध आणि अंडी यांचाही समावेश आहे. इतर महापालिका ३०० ते ४५० रुपये दराने जेवण देत असल्याचा दावा आयुक्तांनी केला.

Web Title: Purchase of medical equipment at low cost, claims Thane Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.