केडीएमसीतील कंत्राटी कामगारांच्या मागण्यासाठी पुंडलिक म्हात्रे कामगार संघटना आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 15:41 IST2026-03-23T15:41:06+5:302026-03-23T15:41:21+5:30
कंत्राटी कामगारांच्या मागण्यासाठी संघटना तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने महापालिका प्रशासनाला देण्यात आला आहे.

केडीएमसीतील कंत्राटी कामगारांच्या मागण्यासाठी पुंडलिक म्हात्रे कामगार संघटना आक्रमक
कल्याण : कल्याण डोेंबिवली महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या प्रलंबित आहे. या मागण्याचा प्रशासनाने सकारात्मक विचार करुन त्या तातडीने सोडविण्यात याव्यात अशी मागणी पुंडलिक म्हात्रे कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा कंत्राटी कामगारांच्या मागण्यासाठी संघटना तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने महापालिका प्रशासनाला देण्यात आला आहे.
कामगार संघटनेचे सचिव दुर्गेश सोनार यांनी सांगितले, कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाचे वारंवार दुर्लक्ष होते. महापालिकेतील स्थायी स्वरुपात काम करणाऱ्या कामगारांप्रमाणे कंत्राटी कामगार काम करीत असतात. त्यांच्या कामाचा मोबदला कमी मिळतो. अनेक कामगारांना किमान वेतन सुद्धा दिले जात नाही.
कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी कामगारांच्या बरोबरीने वेतनदिले जावे. त्यांचे वेतन त्यांच्या खात्यात दर महिन्याच्या ७ तारखेला जमा केले जावे. त्यांनी ओव्हर टाईम काम केल्यास त्याचा मोबदला देण्यात यावा. कचरा वेचक, सफाई कर्मचारी आणि ड्रेनेज विभागातील कामगारांना हातमोजे, मास्क, बूट व गणवेश यांसारखी आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून द्यावीत. कामगारांना वैद्यकीय आरोग्य आणि अपघाती विमा लागू करावा. अपघाती निधन झाल्यास त्यांच्या वारसांसह त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी. कोणत्याीह सबळ कारणाशिवाय त्यांना कामावरुन काढण्यात येऊ नये.
दोनच दिवसापूर्वी पूंडलिक म्हात्रे कामगार संघटनेच्या वतीने कंत्राटी सफाई कामगारांनी काम बंद आंदेालन केले होते. यावेळी संघटनेचे प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी घनकचरा व्यवस्थापन उपायुक्तांची भेट घेतली होती. त्या पश्चात आत्ता सचिन सोनार यांनी प्रसासनाला कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यावर निवेदन दिले आहे. त्याचबरोबर मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनासाचा इशारा दिला आहे.