भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे गॅस सिलेंडर दरवाढ विरोधात निदर्शने; तृतीयपंथीयांची लक्षवेधी उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 18:52 IST2021-07-03T18:47:36+5:302021-07-03T18:52:10+5:30
Gas Cylinder Price Hike : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी गॅस सिलेंडर दरवाढीचा तीव्र शब्दात निषेध केला.

भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे गॅस सिलेंडर दरवाढ विरोधात निदर्शने; तृतीयपंथीयांची लक्षवेधी उपस्थिती
नितिन पंडीत
भिवंडी - पेट्रोल डिझेल दरवाढी पाठोपाठ केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडर दरात देखील भरमसाठ वाढ केली असल्याने केंद्र सरकार विरोधात संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. केंद्र शासनाच्या या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यभर तीव्र आंदोलन सुरू केले असून शनिवारी दुपारी भिवंडीतील धर्मवीर आनंद दिघे चौकाजवळ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे भिवंडी शहराध्यक्ष भगवान टावरे व महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी गॅस सिलेंडर दरवाढीचा तीव्र शब्दात निषेध केला.
विशेष म्हणजे तृतीय पंथीय नागरिकांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. आंदोलनादरम्यान गॅस सिलेंडरला हार घालून या आंदोलनात सहभागी तृतीय पंथीय महिलांनी नृत्य करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने हाय हायच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. या आंदोलनाप्रसंगी सरचिटणीस ऍड सुनील पाटील, राजेश चव्हाण, सुरेंद्र मुळे, युसूफ सोलापूरकर, रसूल खान, असिफ खान यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते व महिला सहभागी झाल्या होत्या.