भिवंडी: पडघानजीकच्या खडवली नदीवर पिकनिक साठी खासगी बसने गेलेल्या नागरिकांच्या बसला पडघा - वडपा जवळ उड्डाण पुलाच्या पिलरला बस धडकल्याने झालेल्या अपघातात एक आठ वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून बसमधील दहा ते बारा प्रवासी जखमी झाले आहेत ज्यातील तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे.शहरातील गैबी नगर, फंडोले नगर परिसरातील नागरिक खाजगी बसने पडघा नजीकच्या खडवली नदीवर पिकनिक साठी गेले होते. सायंकाळी पिकनिकहुन परत येत असताना बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटलेल्याने मुंबई नाशिक महामार्गावरील वडपा पडघा जवळील उड्डाणपूलाच्या पिलरला बस धडकली. झालेल्या अपघातात आठ वर्षाच्या चिमुरडी चा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर दहा ते बारा जण या अपघातात जखमी झाले असून यातील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी उपजिल्हा रुग्णालयात जखमींची भेट घेऊन अपघाता संदर्भात माहिती घेतली व जखमींना योग्य व आवश्यक त्या आरोग्य सुविधा तत्काळ देण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
By नितीन पंडित | Updated: April 25, 2025 23:52 IST