भिवंडी बीओटी रस्त्यांची दुरवस्था; मनसेचा अंजुरफाटा येथे रास्तारोको
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 17:49 IST2021-10-23T17:49:04+5:302021-10-23T17:49:28+5:30
या भागातील जनतेने शिवसेनेवर भरभरून प्रेम केले आहे , येथील आमदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना येथील नागरीकांची साधी चांगले रस्ते देण्याची मागणी ते पूर्ण करू शकत नाहीत या बद्दल अविनाश जाधव यांनी खेद व्यक्त केला आहे.

भिवंडी बीओटी रस्त्यांची दुरवस्था; मनसेचा अंजुरफाटा येथे रास्तारोको
भिवंडी- भिवंडी ग्रामीण मधील मानकोली खारबाव कामण चिंचोटी, भिवंडी कशेळी ठाणे व भिवंडी वाडा मनोर या सर्व रस्त्यांची चाळण झाली आहे. हे रस्ते मृत्यूचा सापळा बनू लागले आहेत. या बाबत अनेक आंदोलने करूनही शासन प्रशासनास जाग येत नसल्याने मनसेतर्फे शनिवारी ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जधाव व प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली अंजुरफाटा येथे रास्तारोको निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भिवंडी लोकसभा अध्यक्ष शैलेश बिडवी, मदन पाटील, शिवनाथ भगत, संजय पाटील, भरत पाटील, मनविसेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष साळवी, शरद नागावकर, मनवि सेनेचे तालुकाध्यक्ष परेश चौधरी यांसह अनेक मनसे सैनिक सहभागी झाले होते. (MNS agitation at Anjurphata, Bhiwandi)
गेले वर्षभर या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मनसे तर्फे आंदोलन करण्यात येत असून रास्तारोको, मानवी साखळी, श्राद्ध आंदोलन करूनही या रस्त्यांच्या परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने कशेळी व खारबाव मालोडी येथील टोलनाका मनसे कार्यकर्त्यानी फोडला होता. या आंदोलनावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कार्यकारी अभियंता एस एम पाटील, उपअभियंता ज्योती शिंदे यांना निवेदन देऊन आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.
या भागातील जनतेने शिवसेनेवर भरभरून प्रेम केले आहे , येथील आमदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना येथील नागरीकांची साधी चांगले रस्ते देण्याची मागणी ते पूर्ण करू शकत नाहीत या बद्दल अविनाश जाधव यांनी खेद व्यक्त करीत, येत्या आठ दिवसात या रस्त्यांच्या दुरुस्ती बाबत योग्य ती पावलं सार्वजनिक बांधकाम विभागाने उचलली नाही, तर उग्र आंदोलन करीत ज्यांच्या विरोधात आंदोलन करण्याची गरज आहे, तेथे गनिमिकाव्याने थडकून जाब विचारला जाईल, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे. या प्रसंगी या रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत सुरू राहण्यासाठी नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .