Police Watch on Schools and Colleges | शाळा-महाविद्यालयांवर आता असणार पोलिसांचा ‘वॉच’
शाळा-महाविद्यालयांवर आता असणार पोलिसांचा ‘वॉच’

कल्याण : शाळा सुटल्यानंतर शाळेबाहेर रिक्षाची वाट पाहणाऱ्या एका सात वर्षांच्या चिमुकलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांना जाग आली आहे. कल्याण-डोंबिवलीतील शाळा आणि महाविद्यालयांच्या आवारात शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत पोलीस कर्मचारी नेमण्यात येणार आहे.

पश्चिमेतील एका शाळेतील सात वर्षांची मुलगी शाळा सुटल्यानंतर बाहेर नेहमीच्या रिक्षाची वाट पाहत होती. मात्र, रिक्षा न आल्याची संधी साधत नवीन जसुजा (२४), विक्रम पुरोहित (१९) आणि अजय दोहारे (३४) यांनी शाळेसमोरच मोडकळीस आलेल्या एका रिकाम्या इमारतीत तिला नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. बाजारपेठ पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. तर, न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मात्र, पोलिसांनी ही घटना गंभीरपणे घेतली आहे. शाळा-महाविद्यालयांच्या आवारात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. प्रत्येक ठिकाणी नेमलेल्या या पोलीस कर्मचाºयाच्या देखरेखीखाली शाळा असेल, असे नियोजन पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी केले आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालये सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेत तेथील परिसरात भरधाव व कर्कश हॉर्न वाजवत गाड्या हाकणाºया रोडरोमियोंनाही चाप बसेल, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, वेगाने गाड्या हाकणाºया अल्पवयीन चालकांना आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणीही पालकांनी केली आहे.

दरम्यान, शहरातील पाडलेल्या इमारती आज भग्नावस्थेत तशाच्यातशा उभ्या आहेत. अशा इमारतींचा वापर गर्दुले, मद्यपी यांच्याकडून सुरू आहे. ‘शक्ती मिल’सारखी एखादी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? महापालिका प्रशासन की पोलीस? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

शाळांमध्ये सुरक्षारक्षक, सीसीटीव्हींचा अभाव
शहरातील अनेक शाळांमध्ये सुरक्षारक्षक तसेच सीसीटीव्हीदेखील नाहीत. या परिस्थितीला शाळा व्यवस्थापनाबरोबर बेजबाबदार पालकही कारणीभूत आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत सोडले म्हणजे पुढे सगळी शाळेची जबाबदारी असल्याचा समज पालकांमध्ये बळावताना दिसतोय.
शाळेबरोबर पालकांचीही तितकीच जबाबदारी आहे. मात्र, त्यांना त्याचा विसर पडत चालला आहे. पण एक गोष्ट मात्र तितकीच खरी आहे की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी एकत्रितपणे काम होणे गरजेचे आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांना जोपर्यंत पालकांच्या ताब्यात दिले जात नाही, तोपर्यंत त्या विद्यार्थ्यांची जबाबदारी त्या शाळेची असेल, अशा सूचना शाळा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या सूचनांकडे लक्ष न देणाºया शाळा प्रशासनावर कडक कारवाई करण्यात येईल.
- विवेक पानसरे, पोलीस उपायुक्त


Web Title: Police Watch on Schools and Colleges
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.