Police search for Thane girl who escaped from home | घरातून पळालेल्या अल्पवयीन मुलीचा ठाणे पोलिसांनी घेतला शोध

नौपाडा पोलिसांची कामगिरी

ठळक मुद्देनौपाडा पोलिसांची कामगिरीक्षुल्लक कारणावरून गेली होती निघूनकुर्ला आणि विद्याविहार रेल्वे स्थानकात काढले दोन दिवस

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : क्षुल्लक कारणावरून घरातून पळालेल्या अल्पवयीन मुलीचा नौपाडा पोलिसांनी अखेर शोध घेतला. दोन दिवसांनी सुखरूप मिळालेल्या या मुलीला अखेर शनिवारी तिच्या पालकांच्या स्वाधीन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नौपाडा परिसरात राहणा-या या सोळावर्षीय मुलीला शाळेत नियमित न गेल्याबद्दल जाब विचारून पालकांनी तिला शाळेत नियमित जाण्याबाबत बजावले होते. याचाच राग आल्याने तिने १० आॅक्टोबर २०१९ रोजी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास घर सोडले. ती घरातून निघताना शाळेत परीक्षेला जाते, असे सांगून ती बाहेर पडली होती. मात्र, परीक्षेनंतर ती घरी न परतल्याने तिच्या अपहरणाचा संशय पालकांना बळावल्याने त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांचे एक पथक तिच्या तपासासाठी नेमले. ठाणे रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तसेच मोबाइलच्या आधारे या पथकाने तिचा शोध घेण्यास सुरुवात केली.
* असा काढला माग
उपनिरीक्षक लबडे यांच्यासह पोलीस हवालदार सुनील अहिरे, पोलीस नाईक साहेबराव पवार, सुनील राठोड, संजय चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल विकास चडचणकर आणि गोरखनाथ राठोड या पथकाने १२ आॅक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास तिचा ठाणे रेल्वेस्थानक परिसरातून शोध घेतला. तिने एका मैत्रिणीला फोन केल्यानंतर हा फोन कुठून आला, याचा शोध या पथकाने घेतला. तो फोन तिने कुर्ला येथून केला होता. कुर्ला येथे मात्र ती आढळली नाही. पुढे तिच्याच मैत्रिणीच्या मार्फतीने पुन्हा संबंधित ठिकाणी फोन करून विश्वासात घेऊन तिला ठाण्यात येण्यास सांगितले. परंतु, तिने घरी येण्यास नकार दिला. मात्र, पोलिसांनी तिची समजूत काढून तिला ठाण्यातून ताब्यात घेऊन आईवडिलांच्या ताब्यात दिले. एक दिवस कुर्ला आणि एक दिवस विद्याविहार रेल्वेस्थानकांत तिने वास्तव्य केल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. शाब्दिक आणि तांत्रिक कौशल्य पणाला लावून पोलिसांनी तिचा शोध घेतल्याबद्दल पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी या पथकाचे कौतुक केले.

Web Title: Police search for Thane girl who escaped from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.