मीरारोड मधील हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकून ५५ जणांवर केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 15:22 IST2025-06-20T15:21:46+5:302025-06-20T15:22:02+5:30
पेणकरपाडा भागातील सी मॅजिक बार अँड रेस्टॉरंट मध्ये बेकायदेशीररित्या शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखू मिश्रीत हुक्का नशेसाठी पुरवला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना मिळाली होती.

मीरारोड मधील हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकून ५५ जणांवर केली कारवाई
मीरारोड- मीरारोडच्या पेणकरपाडा भागात चालणाऱ्या हुक्का पार्लरवर काशीमीरा पोलिसांनी धाड टाकून ५५ जणांवर कारवाई केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून बेकायदा हुक्का पार्लरची बांधकामे अनधिकृत असल्यास ती देखील जमीनदोस्त करून युवा पिढीला हुक्क्याच्या विळख्यातून वाचवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पेणकरपाडा भागातील सी मॅजिक बार अँड रेस्टॉरंट मध्ये बेकायदेशीररित्या शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखू मिश्रीत हुक्का नशेसाठी पुरवला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना मिळाली होती.
माहितीची खात्री पटताच बुधवारी रात्री स्वतः वरिष्ठ निरीक्षक कांबळे यांच्यासह पोलीस निरीक्षक रणजित आंधळे व अन्य अधिकारी कर्मचारी यांनी २ पथके तयार करत हुक्का पार्लर वर धाड टाकली. सी मॅजीक बार मध्ये हुक्काची नशा करणाऱ्या २१ तरुण - तरुणी सह त्यांना तंबाखू मिश्रित हुक्का पुरवणारे कर्मचारी आदी एकूण ५५ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. प्रतिबंधीत तंबाखु मिश्रीत फलेवरचे २५ डबे, हुक्का पिण्याचे साहित्य, लॅपटॉप, स्वाईप कार्ड मशीन तसेच १२ हजार रुपयांची रोख पोलिसांनी जप्त केली.
हुक्का पार्लरचे चालक, मालक, ग्राहक, कॅशीयर, वेटर व अन्य लोकांवर काशीमीरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, सिगारेट व इतर तंबाखु उत्पादने यांच व्यापार व वाणिज्य व्यवहार अधिनियम त्यांचे उत्पादन, पुरवठा व वितरण यावर निर्बंध अधिनियम २००३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.