सदानंद नाईक उल्हासनगर : गणेशउत्सव व ईदच्या पाश्वभूमीवर पोलीस परिमंडळ-४ ने शनिवारी रात्री १२ ते पहाटे ३ दरम्यान ऑपरेशन ऑल आऊट राबवून विविध गुन्ह्यात ८ जणांना अटक तर ५२ जणांना नोटीसा दिल्या. तसेच २९६ वाहनाची तपासणी करून ८६ हजार ५०० रुपये दंडात्मक कारवाई केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.
उल्हासनगर पोलीस परिमंडळ-४ च्या क्षेत्रात सणासुदीचा काळात शांतता राहावी यासाठी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या आदेशानुसार शनिवारी मध्यरात्री १२ ते पहाटे ३ वाजेपर्यंत परिमंडळ क्षेत्रात ऑपरेशन ऑल आऊट राबाविले. यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्तांना छापे व कॉम्बिंग ऑपरेशनचे नेतृत्व दिले असून यामध्ये ४६ पोलीस अधिकाऱ्यांसह २०५ पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. दारूबंदी प्रकरणी ९ जणाला नोटीस देऊन गुन्हे दाखल केले. अंमली पदार्थ सेवन प्रकरणी १० गुन्हे, तंबाखू सेवन प्रकरणी २७ गुन्हे, तर ५ पैकी ३ जणांना वॉरंठ बजावले आहे. १४६ केसेस मधील ६ पैकी ४ तडीपार गुंडाना अटक करून दोघांना नोटीसा दिल्या. ९६ लॉज व बारची तपासणी करून १५४ हिस्ट्रीशीटरची तपासणी केली.
पोलिसांनी ऑपरेशन ऑल आऊट मध्ये विविध गुन्ह्यात ८ जणांना अटक करून एकूण ५४ नोटिसा बजावल्या आहेत. आर्म्स ऍक्ट मध्ये ४ पैकी ३ जणांना अटक करून एकाला नोटीस दिली. तर ३३ जणावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. विविध ८ ठिकाणच्या नाकाबंदी ठिकाणी एकूण २९६ वाहनाची तपासणी करून वाहतूक पोलिसांच्या मदतीने ८६ हजार ५०० रुपये त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. पोलीस उपआयुक्त सचिन गोरे यांच्या ऑपरेशन ऑल आऊटच्या कारवाईने गुन्हेगारी वृत्तीचे गुंड व अनैतिक धंदा करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.