नागरिकांच्या तक्रारीनंतर वाहतूक शाखेच्या उपनिरीक्षकासह पोलीस नाईकाची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 21:14 IST2021-02-18T21:10:00+5:302021-02-18T21:14:16+5:30
एरव्ही, वाहतूकीचे नियम मोडणाºया वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारणाºया वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय जुमले यांनीच आपल्या वाहनांची पीयूसी आणि वीमा संदर्भातील कागदपत्रे अद्ययावत न ठेवल्याने त्यांची अन्यत्र बदली करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्याची वाहतूक शाखेतून बदली
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एरव्ही, वाहतूकीचे नियम मोडणाºया वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारणाºया वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय जुमले यांनीच आपल्या वाहनांची पीयूसी आणि वीमा संदर्भातील कागदपत्रे अद्ययावत न ठेवल्याने त्यांची अन्यत्र बदली करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत नौपाडा युनिटच्या मच्छिद्र माळी या पोलीस नाईकाला वाहतूक शाखेतून मुख्यालयात हलविण्यात आले आहे.
वाहतूक नियंत्रण शाखेच्या नौपाडा युनिटचे उपनिरीक्षक जुमले यांच्याविरुद्ध १५ फेब्रुवारी रोजी एका नागरिकाने पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाण्याचे पोलीस आयुक्त आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. यामध्ये जुमले यांच्या मोटारकार आणि मोटारसायकल या वाहनांचे प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र आणि वीमा ही कागदपत्रे नसल्याचे म्हटले होते. याबाबतची तक्रार राज्य सरकारच्या एमपरिवहन या अॅपवर देण्यात आली होती. त्याचबरोबर महागडया वस्तू खरेदी करतांना जुमले यांनी वरिष्ठांची परवानगी घेतली होती का? याचीही विचारणा या नागरिकाने केली होती. याव्यतिरिक्तही जुमले यांच्याविरुद्ध नागरिकांना अरेरावी केल्याच्या तसेच पैसे घेतल्याच्या तक्रारी उपायुक्त कार्यालयात आल्या होत्या. याचीच दखल घेऊन उपायुक्त पाटील यांनी त्यांची सहायक पोलीस आयुक्तांच्या मार्फतीने चौकशीचे आदेश दिले. तसेच त्यांची नौपाडा येथून व्हीआयपी वाहनांवर बदली करण्यात आली. तसेच, पोलीस नाईक माळी यांनाही यापूर्वी शिक्षा म्हणून अंबरनाथ येथून थेट नौपाडा युनिटमध्ये बदली केले होते. मात्र, त्यांच्याही विरुद्ध अनेक तक्रारी आल्यानंतर त्यांनाही आता वाहतूक शाखेतून पोलीस मुख्यालयात बदली केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘‘ जुमले यांच्याविरुद्ध अरेरावीसह अनेक तक्रारी होत्या. त्यातच त्यांच्या वाहनांचे पीयूसी आणि वीमा नसल्याचीही तक्रार होती. अशा अनेक कारणामुळे त्यांची बदली करण्यात आली आहे. तर पोलीस नाईक माळी यांची मात्र वाहतूक शाखेतून मुख्यालयात बदली केली आहे.’’
बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे शहर