आता काय बोलायचं राव..! मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात वापरले प्लास्टिकचे ग्लास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 16:43 IST2018-07-02T16:41:58+5:302018-07-02T16:43:25+5:30
राज्यात प्लास्टिक बंदी लागू केलेली असतानाही काल मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात प्लास्टिकचे ग्लास वापरण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

आता काय बोलायचं राव..! मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात वापरले प्लास्टिकचे ग्लास
कल्याण : राज्यात प्लास्टिक बंदी लागू केलेली असतानाही काल मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात प्लास्टिकचे ग्लास वापरण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. काल कल्याण येथे झालेल्य कार्यक्रमात हा प्रकार समोर आला आहे. आणि यावेळी प्लास्टिक बंदीला पाठ फिरवत या कार्यक्रमात प्लास्टिकच्या ग्लासचा वापर करण्यात आला आहे. 13 कोटी वृक्षारोपण महामोहिमेच्या राज्यस्तरीय शुभारंभाचा कार्यक्रम काल रविवारी कल्याणजवळील वरप येथील राधास्वामी सत्संग आश्रमामागील वनविभागाच्या जागेवर पार पडला. यावेळी कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. पण सगळ्यांपैकी कोणालाच प्लास्टिक बंदीची आठवण नाही यात आश्चर्य आहे.
काल झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 13 कोटी वृक्षारोपण महामोहिमेच्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, भारताच्या इतिहासातील नवीन विक्रम करणारा आजचा दिवस आहे. वृक्षलागवडीचा कार्यक्रम आता केवळ सरकारचा राहिलेला नसून तो लोकचळवळीचा भाग बनला आहे. भावी पिढीसमोर जल, जंगल, जमीन वाचवण्याचे आव्हान उभे ठाकले असताना वृक्षलागवडीची लोकचळवळ महाराष्ट्रात हरित क्रांती घडवेल.