CoronaVirus News : जिल्ह्यात एकाच कंपनीची लस वापरण्याचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 00:42 IST2020-12-23T00:41:53+5:302020-12-23T00:42:14+5:30
CoronaVirus News in Thane : लस प्राप्त झाल्यापासून बूथवर पोहोचेपर्यंत विशेष कोल्डचेनची निर्मिती केली जात असून, कंपनीनुसार ०.१ एमएल ते ०.५ एमएलचा डोस असेल.

CoronaVirus News : जिल्ह्यात एकाच कंपनीची लस वापरण्याचे नियोजन
ठाणे : कोरोना लसीकरणासाठी राज्याच्या धर्तीवर जिल्हास्तरावर टास्क फोर्सचे नियंत्रण राहणार आहे. बूथवर कागदपत्रांच्या पडताळणीनंतर लस दिली जाणार असून जिल्ह्यात शक्यतो एकाच कंपनीची लस वापरण्यात येणार आहे.
लस प्राप्त झाल्यापासून बूथवर पोहोचेपर्यंत विशेष कोल्डचेनची निर्मिती केली जात असून, कंपनीनुसार ०.१ एमएल ते ०.५ एमएलचा डोस असेल. ठरावीक दिवसांच्या अंतराने दोन वेळा डोस घ्यावा लागेल. पहिली लस घेतल्यानंतर दुसऱ्यांदा लसीसाठी नोंदणीकृत मोबाइलवर मेसेज पाठविला जाईल. ऑटोडिस्पोझल सिरिंजमुळे एका वापरानंतर ती नष्ट केली जाईल. नोंदणीकृत व्यक्तींच्या कागदपत्रांची तपासणी बूथवर केली जाईल. यानंतर बूथवर नियुक्त अधिकारी ओळखपत्र व अन्य पडताळणी करतील. यानंतर संबंधितांना प्रतीक्षा कक्ष (वेटिंग रूम) येथे बसविले जाईल. शारीरिक अंतर ठेवून क्रमांकानुसार लसीकरण कक्षात (व्हॅक्सिनेशन रूम) सोडले जाईल. तेथे लसीकरणाचा डोस दिल्यानंतर पुढील टप्प्यात संबंधितांना निरीक्षण कक्ष (ऑब्जर्व्हेशन रूम) मध्ये काही काळ बसावे लागेल. यादरम्यान काही त्रास उद्भवल्यास उपचारासाठी प्रणाली उपलब्ध असणार आहे.