Pet dog bites girl in Thane: Father files case against son and father | ठाण्यात पाळीव कुत्र्याचा मुलीला चावा: पिता पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल

ठाण्यात पाळीव कुत्र्याचा मुलीला चावा: पिता पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्दे नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलदहा महिन्यांनी दाखल झाली तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: हरिनिवास, महादेव टॉवर सोसायटीतील एका पाळीव कुत्र्याने एका २३ वर्षीय तरुणीला चावा घेतल्याचा प्रकार नोव्हेंबर २०१९ मध्ये घडला होता. वारंवार पाठपुरावा करुनही याबाबत नौपाडा पोलीस तक्रार दाखल करीत नव्हते. अखेर मुलीचे वडिल भरतकुमार पिसाट यांनी ठाणे शहर पोलिसांच्या ट्वीटर हॅन्डलवर तक्रार केल्यानंतर याप्रकरणी महेश मोरे आणि त्यांचा मुलगा निरंजन मोरे यांच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हरी निवास सर्कल येथील महादेव टॉवर सोसायटीतील महेश मोरे यांनी पाळलेल्या कुत्र्याने नाजूका पिसाट (२३) हिला चावा घेतल्याचा प्रकार २५ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार नौपाड्यात घडला होता. नाजूका कामावर जात असतांना या कुत्र्याने नाजूकाच्या पायावर चावा घेतला होता. याप्रकरणी तिच्यावर औषधोपचार केल्यानंतर तिचे वडिल भरतकुमार पिसाट यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. परंतू, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केल्याचा आरोप पिसाट यांनी केला आहे. वारंवार पाठपुरावा करुनही गुन्हा दाखल होत नसल्यामुळे अखेर याबाबतची तक्रार ठाणे शहर पोलिसांच्या ट्वीटर हॅन्डलवर १९ सप्टेंबर २०२० रोजी पिसाट यांनी केली. हीच तक्रार त्यांनी पोलीस महासंचालकांकडेही केली. याची तात्काळ म्हणजे दुसऱ्याच दिवशी दखल घेण्यात येऊन ठाणे शहर पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाने २० सप्टेंबर रोजी नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्याकडे ही तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी मांगले यांच्याकडे ही कैफियत मांडली. याप्रकरणी अखेर दहा महिन्यांनी कलम २८९, ३३७ नुसार महेश मोरे आणि निरंजन मोरे या पिता पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 ‘‘ भरतकुमार पिसाट यांनी या श्वान दंशप्रकरणी केवळ आॅनलाईन तक्रार अर्ज दिला होता. लॉकडाऊनमुळे ते प्रत्यक्षात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले नव्हते. तक्रारीवर त्यांची स्वाक्षरी अपेक्षित होती. कुत्रा चावल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्रही त्यांनी दिले नव्हते. यात मोरे यांनी कुत्रे पाळायची परवानगीही घेतलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.’’
अनिल मांगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नौपाडा
 

Web Title: Pet dog bites girl in Thane: Father files case against son and father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.