निवडणूक प्रचारासाठी परवानगी आवश्यक 

By नितीन पंडित | Published: April 16, 2024 08:00 PM2024-04-16T20:00:53+5:302024-04-16T20:01:31+5:30

परवानगी न घेता प्रचार केल्यास होणार कारवाई.

Permission required for election campaigning | निवडणूक प्रचारासाठी परवानगी आवश्यक 

निवडणूक प्रचारासाठी परवानगी आवश्यक 

भिवंडी: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून या निवडणुकीत राजकीय पक्षांनी योग्य त्या परवानगी न घेतल्यास त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल असा इशारा भिवंडी लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिला आहे.मंगळवारी ते उपविभागीय अधिकारी कार्यालयात विवीध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या स्थायी समिती बैठकीत बोलत होते.

सध्या उमेदवार नसल्याने राजकीय पक्ष प्रतिनिधी स्तरावर ही बैठक घेण्यात आली होती. निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाही सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली असून त्या ठिकाणी सर्व परवानग्या उमेदवारांना मिळणार आहेत,त्यामुळे उमेदवारांनी प्रचारासाठी आवश्यक त्या परवानग्या घेणे आवश्यक आहे, कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता प्रचार केल्यास नियमा नुसार कारवाई करणार असा ईशारा निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिला.या बैठकीला विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी संबंधीत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यक्षेत्रातील संबंधीत पोलीस विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते. 

या बैठकीत नामनिर्देशन पत्र भरताना तो अचुक भरा, तसेच नामनिर्देशन भरताना सोबत जोडावयाचे प्रतिज्ञापत्रे भरताना सर्व तपशील व्यवस्थित पुर्ण भरा,उमेदवारांने त्याचे अलिकडील काळात काढलेले तीन फोटो नामनिर्देशन अर्जा सोबत घेवून येणे अपेक्षीत आहे अशा सूचना करीत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार उमेदवार व राजकीय पक्षाने तीन वेळा प्रिंट मिडीया व इलेक्ट्रानिक मिडिया मधून उमेदवाराची माहितीचे जाहीर प्रकटन करणे आवश्यक आहे. निवडणुकीकरीता उमेदवाराने स्वतंत्र बँक खाते उघडावे व त्या खात्यातून सर्व निवडणूक खर्च करावा. प्रत्येक उमेदवाराला निवडणूक खर्चाची मर्यादा ९५ लाख असणार आहे. उमेदवाराने केलेला हा सर्व खर्च केंद्रीय निवडणूक निरिक्षक तपासतील. उमेदवाराचा प्रचार सभा,रँली याचे सर्वांचे व्हीडीओ शुटींग करण्यात येणार आहे. उमेदवाराला प्रचारासाठी लागणारी सर्व प्रकारची वाहने वापरणे कामी पुर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.प्रत्येक वाहनाचा खर्च हा स्वतंत्रपणे दाखवणे आवश्यक आहे.सर्व प्रकारच्या परवानग्या घेण्यासाठी किमान तीन दिवस आगोदर अर्ज करून परवानगी घेणे आवश्यक आहे.प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या निकषावर सर्व परवानग्या देण्यात येतील. उमेदवार किंवा त्याचा प्रतिनिधी ईव्हीएम मशीन आणतेवेळी, स्ट्राँग रूम मध्ये ठेवताना उपस्थित राहू शकतात.कोणत्याही प्रकारचे प्रचार साहित्य प्रसिध्द करणेकामी निवडणूक निर्णय अधिकारी यांची पुर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच समाज माध्यम व इलेक्ट्रानिक मिडीयावर प्रचार करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रसार माध्यम यांच्याशी संपर्क साधून जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची पुर्व परवानगी न घेता कोणत्याही प्रकारचे प्रचाराचे साहित्य प्रसिध्द करण्यात येऊ नये,अशा सूचना यावेळी जाधव यांनी दिल्या आहेत.

Web Title: Permission required for election campaigning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.