ठाण्यात रिक्षावर झाड पडून प्रवाशाचा मृत्यू, रिक्षा चालक जखमी
By अजित मांडके | Updated: May 7, 2025 21:28 IST2025-05-07T21:27:44+5:302025-05-07T21:28:01+5:30
Thane News: ठाण्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसात सायंकाळी सहा च्या सुमारास रूणवाल नगर परिसरात धावत्या रिक्षावर गुलमोहराचे झाड पडून रिक्षातील प्रवाशाचा मृत्यू झाला तर रिक्षा चालक जखमी झाला आहे.

ठाण्यात रिक्षावर झाड पडून प्रवाशाचा मृत्यू, रिक्षा चालक जखमी
- अजित मांडके
ठाणे - ठाण्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसात सायंकाळी सहा च्या सुमारास रूणवाल नगर परिसरात धावत्या रिक्षावर गुलमोहराचे झाड पडून रिक्षातील प्रवाशाचा मृत्यू झाला तर रिक्षा चालक जखमी झाला आहे.
या घटनेत प्रवासी तौफिक सौदागर (२७) याचा मृत्यू झाला असून रिक्षाचालक शफीक शब्बीर (५०) हे जखमी झाले आहेत. यामध्ये रिक्षाचालक शफीक याच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तसेच प्रवासी तौफिक यालाही गंभीर दुखापत झाल्याने तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अशी माहिती ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार यांनी दिली.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी राबोडी पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी धाव घेतली. तसेच पडलेले झाड कापून एका बाजूला करण्यात आले असून ते दोघे ही राबोडी परिसरात राहणारे आहेत. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.