पत्रीपुलावर शिवसैनिकांची स्टंटबाजी, वाहतूक सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 04:13 AM2018-08-26T04:13:54+5:302018-08-26T04:14:13+5:30

वाहतूक सुरू करण्याची मागणी : पोलिसांनी हाणून पाडला प्रयत्न, पालकमंत्र्यांच्या फोनमुळे नरमाईची भूमिका

On the party's footsteps, Shivsainik's stunts, demands for traffic | पत्रीपुलावर शिवसैनिकांची स्टंटबाजी, वाहतूक सुरू करण्याची मागणी

पत्रीपुलावर शिवसैनिकांची स्टंटबाजी, वाहतूक सुरू करण्याची मागणी

Next

कल्याण : शहरातील जुना पत्रीपूल धोकादायक बनल्याने वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. मात्र, त्यामुळे वाहतूककोंडी होत असल्याने शिवसैनिकांनी स्टंटबाजी करत शनिवारी दुपारी हा पूल सुरू करण्याचा प्रयत्न केला. परंतु, रेल्वे प्रशासनाकडून लेखी आदेश येत नाहीत, तोपर्यंत पूल वाहतुकीसाठी सुरू करता येणार नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी कायदा हाती घेऊ नये, असे सांगत पोलिसांनी पुलावरून वाहतूक सुरू करण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान, पूल २५ सप्टेंबरपर्यंत पादचाऱ्यांसाठी खुला राहील, असे रेल्वेने प्रसिद्धिमाध्यमांना सांगितले.

जुना पत्रीपूल पाडण्याचे काम शनिवारपासून हाती घेतले जाईल, असे रेल्वेने बुधवारी जाहीर केले होते. त्यानुसार, पूल वाहतुकीस बंद करण्यात आला. परंतु, पुलाच्या परिसरात होणाºया कोंडीमुळे जुन्या पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश जाधव, जयवंत भोईर, नगरसेविका रेखा जाधव, माजी नगरसेवक कैलास शिंदे, सचिन बासरे, आशा रसाळ यांनी केली. त्यावर, पुलावरून कोणत्याही परिस्थितीत वाहतूक सुरू करता येणार नाही. शिवसैनिकांनी कायदा हाती घेऊ नये, असे पोलिसांनी त्यांना बजावले. पुलावरून वाहतूक सुरू करण्याबाबत रेल्वेकडून आदेश मिळालेले नाहीत. रेल्वे अधिकारी व पालकमंत्र्यांसोबत बैठक सुरू आहे. त्यातील निर्णयानुसार अमल करू, असे पोलिसांनी शिवसैनिकांना सांगितले. यावेळी एका पोलीस अधिकाºयाने पालकमंत्री शिंदे यांना फोन लावून शिवसैनिकांचे बोलणे करून दिले. शिंदे यांच्या आदेशानंतर शिवसैनिकांनी शांततेचा पवित्रा घेतला.
भोपाळच्या एजन्सीने पुलाची पाहणी केली होती, तेव्हा आणखीन काही वर्षे पुलाचा वापर करता येईल, असे स्पष्ट केले होते, याकडे शिवसैनिकांनी लक्ष वेधले. रविवारी रक्षाबंधन असल्याने दोन दिवस पूल हलक्या वाहतुकीसाठी खुला करावा, असा आग्रह शिवसैनिकांनी धरला. तब्बल तीन तास हा प्रकार सुरू होता. शिवसैनिक पुलाचे बॅरिकेड तोडून वाहतूक सुरू करण्याच्या बेतात होते. त्यामुळे पोलीस फौजफाटा तैनात होता.

पत्रीपूल पाडण्यासाठी घ्यावा लागणार जम्बोब्लॉक, यंत्रणांपुढे आव्हान
जुना पत्रीपूल लवकरात लवकर पाडण्यासाठी रेल्वेकडून दबाव आणला जात आहे. शनिवारपासून हा पूल पाडण्याची घोषणा करण्यात आली होती. पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केल्यानंतर त्यावरील पथदिवे, दूरध्वनी, वीजवाहिन्या आदी काढण्यास सुरुवातही झाली आहे. परंतु, हा पूल पाडण्यासाठी रेल्वेला मोठा जम्बोब्लॉक घ्यावा लागणार आहे.
कल्याण हे मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे जंक्शन आहे. या स्थानकातून कर्जत, कसारामार्गे लोकल तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्या जातात. मालगाड्यांचे मोठे यार्ड येथे आहे. या सर्वच गाड्यांची वाहतूक कल्याणहून दिवसरात्र सुरू असते. त्यामुळे पुलाच्या पाडकामासाठी जम्बोब्लॉक घेताना रेल्वेला या गाड्या अन्य मार्गांनी वळवाव्या लागतील किंवा त्यांच्या फेºया रद्द कराव्या लागतील. रेल्वे प्रशासनासाठी ते मोठे आव्हान असणार आहे.

सध्या मुंब्रा बायपास बंद असल्याने तेथील वाहतूक कल्याण-शीळ या मार्गाने वळवण्यात आली आहे. त्यामुळे शहरात कोंडी होत आहे. गणेशोत्सवही तोंडावर आला आहे. या बाबी विचारात घेतल्यास सध्या पत्रीपूल पाडणे यंत्रणांसाठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे मुंब्रा बायपास सुरू झाल्यानंतर पाडकाम हाती घेणे योग्य ठरणार आहे.

जुना पूल पाडताना नवीन पुलावरील वाहतूकही काही वेळ बंद ठेवावी लागू शकते. त्यादृष्टीने वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे. त्याचबरोबर राज्य रस्ते विकास महामंडळ, केडीएमसी, पोलीस, वाहतूक पोलीस याचबरोबर अन्य यंत्रणांनाही रेल्वेला सोबत घेऊन नियोजन करावे लागणार आहे.

मुंब्रा बायपास सुरू झाल्यावर दिलासा?
डोंबिवली : जुना पत्रीपूल वाहतुकीस बंद केल्याने कल्याण शहरात तसेच कल्याण-शीळ या मार्गावर वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालक जेरीस आले आहेत. वाहतूक नियोजन व त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शनिवारी पोलीस उपायुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली.
यावेळी शहरातील गोविंदवाडी बायपास, दुर्गाडी, बाईचा पुतळा, वालधुनी, आग्रा रोड, सहजानंद चौक, शिवाजी चौक, महापालिका परिसर तसेच वायलेनगर, गांधारी आदी भागांमध्ये वाहतुकीचे नियोजन करण्याबाबत चर्चा झाली. सण-उत्सवाच्या कालावधीत कोणाचीही गैरसोय होऊ नये, यादृष्टीने काळजी घेण्याची सूचनाही देण्यात आली.
१० सप्टेंबरनंतर मुंब्रा बायपास सुरू झाल्यावर सध्या पडणारा ताण काहीसा हलका होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. वाहतूक विभागाचे प्रभारी सहायक पोलीस आयुक्त एस. गोसावी, डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर तसेच विविध पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Web Title: On the party's footsteps, Shivsainik's stunts, demands for traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.