मुलाचे लग्न पाहण्याआधीच आई-वडिलांनी मिटले डोळे; पोलादपूरच्या अपघातात सावंत कुटुंब उध्वस्त

By पंकज पाटील | Updated: August 30, 2022 21:26 IST2022-08-30T21:25:20+5:302022-08-30T21:26:09+5:30

पोलादपूर येथे शिवशाही बस आणि एका खाजगी एर्टिगा गाडीची झालेली धडक अत्यंत भयानक होती. या अपघातात अंबरनाथच्या आनंद विहार परिसरात राहणारे सावंत कुटुंब पूर्णपणे उध्वस्त झाले आहे.

Parents close their eyes before seeing their son's marriage; Sawant family destroyed in Poladpur accident | मुलाचे लग्न पाहण्याआधीच आई-वडिलांनी मिटले डोळे; पोलादपूरच्या अपघातात सावंत कुटुंब उध्वस्त

मुलाचे लग्न पाहण्याआधीच आई-वडिलांनी मिटले डोळे; पोलादपूरच्या अपघातात सावंत कुटुंब उध्वस्त

पंकज पाटील/ महेश मोरे - 

अंबरनाथ
- धाकट्या मुलाच्या लग्नाची धावपळ घरात सुरू असतानाच आपल्या मुलाचे लग्न मोठ्या थाटात आणि आनंदात करण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या एका माता-पित्याला आपले स्वप्न अर्धवट सोडून जगाचा निरोप घेण्याची वेळ आली. धाकट्या मुलाचे लग्न पाहण्याआधीच या मातापित्यावर काळाने घाला घातला आणि क्षणार्धात एक संसार पूर्णपणे उध्वस्त झाला.

पोलादपूर येथे शिवशाही बस आणि एका खाजगी एर्टिगा गाडीची झालेली धडक अत्यंत भयानक होती. या अपघातात अंबरनाथच्या आनंद विहार परिसरात राहणारे सावंत कुटुंब पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. मंगळवारी पहाटे पाच वाजता जयवंत सावंत हे त्यांची पत्नी जयश्री सावंत, मुलगा गिरीश सावंत यांच्यासह किरण घागे आणि अमित पितळे ही मंडळी गणेशोत्सवासाठी कोकणात निघाले होते. त्यांची गाडी पोलादपूरजवळ पोहोचली असताना शिवशाही बससोबत त्या गाडीची धडक झाली आणि त्यात जयवंत सावंत आणि किरण घागे हे दोघे जागीच ठार झाले तर जयश्री सावंत, गिरीश सावंत आणि अमित भितळे यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान जयश्री सावंत यांचे देखील निधन झाले. तर सावंत कुटुंबातील गिरीश सावंत हा अजूनही मृत्यूची झुंज देत आहे. सावंत कुटुंबातील कुटुंबप्रमुख जयवंत सावंत हे काही वर्षांपूर्वीच एमआयडीसी मधून निवृत्त झाले होते, तर त्यांची दोन मुले जयेश आणि गिरीश यांनी कुटुंबाची सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. कुटुंबातील मोठा मुलगा जयेश याचे लग्न झाले असून गिरीश याच्या लग्नाची तयारी सुरू होती. डिसेंबर महिन्यात गिरीश याचे मोठा धुमधडाक्यात लग्न करण्याची तयारी देखील घरात सुरू होती. धाकट्या मुलाचे लग्न आनंदात पार पडावे, अशी इच्छा स्वाभाविकच त्याच्या मातापित्यांना होती. मात्र या आनंदाच्या क्षणी आपण राहणारच नाहीत याची किंचितही जाणीव या माता-पितांना नव्हती. 

पोलादपूरच्या अपघातात जयवंत सावंत आणि त्यांच्या पत्नी जयश्री सावंत यांना आपले प्राण मुकावे लागले. एका माता पिताने आपल्या मुलाप्रती बाळगलेली स्वप्ने या पोलादपूरच्या अपघातात चक्काचूर झाले. आई-वडिलांनी प्राण गमावला आणि धाकटा मुलगा हा देखील मृत्यूची झुंज देत असल्याने सावंत कुटुंब पूर्णपणे उध्वस्त झाले आहे.
 

Web Title: Parents close their eyes before seeing their son's marriage; Sawant family destroyed in Poladpur accident