पालघर जिल्ह्याला मिळणार 200 खाटांचे रुग्णालय ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 01:34 AM2021-02-12T01:34:30+5:302021-02-12T01:34:46+5:30

मुख्यमंत्र्यांच्या आजच्या दौऱ्याकडे जिल्हावासीयांचे लागले लक्ष

Palghar district to get 200-bed hospital? | पालघर जिल्ह्याला मिळणार 200 खाटांचे रुग्णालय ?

पालघर जिल्ह्याला मिळणार 200 खाटांचे रुग्णालय ?

googlenewsNext

पालघर : कुपोषण, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य, आरोग्यसेवा आणि पर्यटन आदी अनेक वर्षांपासूनच्या जिल्ह्याला चिटकून बसलेल्या समस्यांचा आढावा घेत नव्याने अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जव्हार-मोखाड्यात पर्यटनाच्या माध्यमातून विकासात्मक कायापालट करण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी जव्हारला भेट देत आहेत. या भेटीदरम्यान जव्हार येथे २०० खाटांचे हॉस्पिटल- मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी विनामूल्य जमीन देण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

पालघरमधील आदिवासीबहुल आणि दुर्गम समजल्या जाणाऱ्या जव्हार, मोखाडा या भागातील कुपोषणच्या बरोबरीनेच रोजगार, स्थलांतर या महत्त्वपूर्ण बाबींसाठी आजपर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यश आलेले नाही.

 जव्हार शहराला मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. पाऊस आणि थंडीच्या जुलै ते मार्च या ९ महिन्यांच्या आल्हाददायक वातावरणाचा लाभ उचलण्यासाठी हजारो पर्यटक या भागाला भेटी देत असतात. जव्हार हा पर्यटनाच्या दृष्टीने ‘ब’ गटात मोडत असून आतापर्यंत देवबांध येथील पर्यटनस्थळ, दाभोसा धबधबा, हिरडपाडा धबधबा, वाशाळा पांडवलेणी, ओसारविरा, हनुमान पॉईंट आदी पर्यटनस्थळांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू करण्यात आली आहेत. 

जव्हार तालुक्यातील सूर्यमाळ या नानाविध वनौषधीने संपन्न असलेल्या भागाचा उपयोग व्यावसायिक स्वरूपात करून रोजगाराच्या संधीबरोबरच पर्यटन विकास साधण्याच्या दृष्टीने काही घोषणा होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा तालुक्यात सण २०१९-२० मध्ये गावपाड्यातील नागरिकांसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी १२३ टँकर सुरू केले होते. त्यात जव्हार तालुक्यातील ८ गावे, १५ पाड्यात ७ टँकर, मोखाडा तालुका- २५ गावे, ६८ पाडे, २७ टँकर, विक्रमगड तालुका- १ गाव, २७ पाडे, ३ टँकर, वाडा- ४ गावे, २१ पाडे, ४ टँकर असे एकूण ३७ गावांत १२३ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. 

यामुळे ज्या भागात असलेल्या धरणांतून मुंबई, ठाणे भागाला पाणीपुरवठा केला जातो, त्या भागात मात्र पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होत महिलांना ५ ते ७ कि.मी. पाण्यासाठी आजही पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे वर्षभर इथल्या महिलांच्या डोक्यावरील हंडा आणि त्यांची होणारी पायपीट थांबविण्यासाठी मुख्यमंत्री नव्याने काही उपाययोजना आखण्याची शक्यता आहे. इथल्या आरोग्याच्या अपुऱ्या व्यवस्थेला आळा घालण्यासाठी २०० खाटांचे हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभारणीसाठी जव्हार येथील जागा शासनाला विनामूल्य देण्याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

जव्हारमधील पर्यटनवाढीसाठी पाच किमी परिसरातील वृक्षतोड रोखून नव्याने वृक्षलागवड केल्यास पर्यटन वाढीस मोठा फायदा मिळू शकतो.
- दिनेश भट, 
माजी नगराध्यक्ष, जव्हार

Web Title: Palghar district to get 200-bed hospital?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.