रुग्णवाहिकेने बाइकस्वारांना चिरडले, दोघांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 08:39 IST2025-10-26T08:39:19+5:302025-10-26T08:39:32+5:30
रुग्णवाहिका चालकालाही दुखापत

रुग्णवाहिकेने बाइकस्वारांना चिरडले, दोघांचा जागीच मृत्यू
मोखाडा : जव्हारकडून नाशिककडे भरधाव जाणाऱ्या रुग्णवाहिकेने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील चालक अनिल सीताराम खरपडे व मागे बसलेला चिंतामण कृष्णा किरकिरे हे दोघे ठार झाले आहेत. रुग्णवाहिका चालकालाही दुखापत झाली असल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मोखाडा पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबर रोजी रात्री ८.१५ च्या सुमारास शासकीय रुग्णवाहिका चालक रमेश रामराव बर्डे, (४५) हे चालवत नाशिक दिशेकडे नेत होते. त्यावेळी अपघात घडला.
रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष
रुग्णवाहिका चालकाने रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून निळमाती गावाच्या मागे वळणावर समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला. रुग्णवाहिका चालक बर्डेवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच त्यालाही दुखापत झालेली असल्याने त्याच्यावर उपचार करून त्याला ताब्यात घेतले जाणार
असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांनी दिली आहे.