पाकिस्तानने भारताकडे वाकड्या नजरेने पाहू नये: एकनाथ शिंदे; शिंदेसेनेची ठाण्यात तिरंगा रॅली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 05:29 IST2025-05-15T05:28:38+5:302025-05-15T05:29:02+5:30
तिन्ही सैन्य दलांचे अभिनंदन करण्याबरोबरच त्यांच्या पाठीशी देश खंबीरपणे उभे असल्याचे दाखवून देण्यासाठी ही रॅली काढल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

पाकिस्तानने भारताकडे वाकड्या नजरेने पाहू नये: एकनाथ शिंदे; शिंदेसेनेची ठाण्यात तिरंगा रॅली
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : पाकिस्तानने आपल्या भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये, अशाप्रकारचे शौर्य आपल्या तिन्ही दलाच्या सैन्याने दाखवले आणि त्यांच्या पाठीशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाण्यात तिरंगा रॅलीदरम्यान व्यक्त केली.
पहलगाम येथे पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात २६ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर ७ मे रोजी पहाटे भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या परिसरातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. या हल्ल्याला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव दिले. ऑपरेशन सिंदूरबद्दल सर्वच स्तरातून भारतीय सैन्य दलावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी शिंदेसेनेने बुधवारी तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते.
‘देश जवानांच्या पाठीशी’
शासकीय विश्रामगृह येथून ही रॅली सुरू झाली. या रॅलीमध्ये शिंदे सहभागी झाले होते. यावेळी खा. नरेश म्हस्के, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे उपस्थित होते. या रॅलीदरम्यान त्यांनी संवाद साधत ही रॅली काढण्यामागचे कारण स्पष्ट केले. तिन्ही सैन्य दलांचे अभिनंदन करण्याबरोबरच त्यांच्या पाठीशी देश खंबीरपणे उभे असल्याचे दाखवून देण्यासाठी ही रॅली काढल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.