Oxygen: ऑक्सिजनची तातडीने गरज असलेल्या रुग्णांसाठी 'ऑक्सिजन बॅंक'; शिवसेनेचा नवा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 19:26 IST2021-05-01T19:26:09+5:302021-05-01T19:26:44+5:30
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनने एमएमआर विभागासाठी १२० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या 'ऑक्सिजन बॅंक'चा शुभारंभ केला

Oxygen: ऑक्सिजनची तातडीने गरज असलेल्या रुग्णांसाठी 'ऑक्सिजन बॅंक'; शिवसेनेचा नवा उपक्रम
ठाणे – कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात बेड मिळेपर्यंत मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते. या रुग्णांना तातडीने घरच्याघरी ऑक्सिजन मिळावा, यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑक्सिजन बॅंक योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या नवीन योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
एमएमआर रीजनमध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. ही गरज लगेचच्या लगेच भरून काढता येणे अवघड आहे. अनेकदा ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळेपर्यंत त्यांची तब्येत खालावते. अशा गरजू रुग्णांना दिलासा देण्यासाठी शिंदे यांनी या ऑक्सिजन बॅंकेच्या माध्यमातून दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. या ऑक्सिजन बँकेत सुरुवातीला पाच लिटर क्षमतेचे १२० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ठेवण्यात येणार असले तरी कालांतराने १० लिटर क्षमतेचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ठेवण्यात येतील, असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
या ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन्सद्वारे हवेतील ऑक्सिजन शोषून घेऊन त्यातील नायट्रोजन वेगळा करुन रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना वैद्यकीय कक्ष यांच्या माध्यमातून ही सेवा ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथील गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. कोरोनाचा कहर वाढत असताना अनेक रुग्णांना ऑक्सिजनअभावी जीव गमवावा लागल्याच्या घटना आपण दररोज ऐकत आहोत. अशात डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांनी सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच पथदर्शी ठरेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
या प्रसंगी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे आणि त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती. गरजू कोविड रुग्णांच्या नातेवाईकांनी या ऑक्सिजन बँकेचा लाभ घेण्यासाठी शिवसेना वैद्यकीय कक्ष कार्यालय, मंगला हायस्कूल शेजारी, कोपरी ठाणे पूर्व येथे संपर्क साधावा, असे आवाहनही शिंदे यांनी केले.