आमच्या शाळेचा विद्यार्थी आॅनर आॅफ आॅस्ट्रेलिया!
By Admin | Updated: November 14, 2016 04:00 IST2016-11-14T04:00:14+5:302016-11-14T04:00:14+5:30
आपल्या शाळेने १२५व्या वर्षात पदार्पण केले आहे, कसं वाटतय? - अरेऽऽऽ! आनंदाचं उधाण आलंय. शाळा म्हणजे माझी आई. आता ‘१२५’ वर्षांची झालीय

आमच्या शाळेचा विद्यार्थी आॅनर आॅफ आॅस्ट्रेलिया!
आपल्या शाळेने १२५व्या वर्षात पदार्पण केले आहे, कसं वाटतय?
- अरेऽऽऽ! आनंदाचं उधाण आलंय. शाळा म्हणजे माझी आई. आता ‘१२५’ वर्षांची झालीय, याचा खूप खूप आनंद आहे. असा योग प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. खूप भाग्यवान आहोत आपण.
आज आम्हा आजी विद्यार्थ्यांना पाहून तुम्हाला तुमची ‘विद्यार्थीदशा’ आठवत असेल ना?
- हा गं. खरंच, तुम्हाला पाहिलं, शाळेत आलो आणि माझं मन ४० वर्ष मागे गेलं. त्यावेळी ठाणं खूप छोटं होतं. शाळेजवळच घर त्यामुळे शिक्षकांचा पालकांशी रोजचा संपर्क असायचा. शाळेत काही वाईट ‘उद्योग’ केला की, शाळेत मार आणि शाळेत मार खाल्ला म्हणून घरी मार! पण यामुळेच मी ‘घडलो’, हे प्रांजळपणे सांगतो. शाळेनेच मला घडवलं; पण तरीही एक खरं आहे, शाळेत मी विद्यार्थी नव्हतो ‘परीक्षार्थी’ होतो. विद्यार्थी म्हणून शिकलो असतो तर कदाचित याहीपेक्षा जास्त यश संपादित केलं असतं.
तुम्हाला टेक्निकल या विषयाची पहिल्यापासून आवड होती का?
- छे छे. अजिबात नाही. सगळे माझे मित्र गेले म्हणून मी गेलो. त्यात टेक्निकलला गेलं म्हणजे शाळा अर्धा दिवसच आणि भरपूर क्रिकेट खेळायला मिळते, हीच काय ती माझी आवड; पण त्यामुळे माझा टेक्निकल बेस पक्का झाला, हे मात्र नक्की.
शालेय जीवनातल्या तुमच्या काही आठवणी सांगा ना...
- खूप आहेत. त्यावेळी आम्हाला इंग्रजी व्ही.सी. परांजजे’ शिकवायचे. प्रथम इंग्रजी परिच्छेद ते मोठ्याने वाचत. नंतर आम्हाला सांगायचे. वाचताना जर ‘,’ आला आणि नाही थांबलो, तर पायावर छडी बसायची. त्यामुळे माझ्या बोलण्यात, वाचण्यात, लिहण्यात परफेक्शन आलं. गणिताचे चितळे सर, सवि कुलकर्णी तर चालतं बोलतं विद्यापीठच! पराष्टेकर बाई, डोंगरे सर, नि.गो. पंडितराव... आज सगळ्यांची खूप आठवण येतेय. सुबोध देशपांडे सरांनी केलेली कविता आजही माझ्या लक्षात आहे. धन्य ते शिक्षक. आज मी जो काही आहे, तो केवळ शाळेमुळेच.
पुढे तुम्ही उच्चशिक्षणासाठी, नोकरीसाठी परदेशात गेलात. तिथली शिक्षणपद्धती आणि आपली... काय सांगाल?
- खूपच फरक आहे. खरं पाहिलं तर भारतातील विद्यार्थ्यांकडे प्रचंड बुद्धिमत्ता आहे; पण आपण जास्त ‘थेअरी’वर भर देतो आणि परदेशात शालेय शिक्षणापासूनच ‘प्रॅक्टिकल’वर. थोडक्यात ‘हार्डवर्क’पेक्षा ‘स्मार्टवर्क’ला जास्त प्राधान्य देतात. अर्थात या दोन्ही गोषटींची गरज आहे हं!
नोकरी, संसार परक्या देशात राहून तुम्ही सांभाळलात. उच्चशिक्षण संपादित केलंत, कसा होता तुमचा प्रवास?
- खूपच संघर्षमय! परक्या देशात तुम्हाला कोणी पटकन आपलंस करत नाही. तिथे घट्ट पाय रोवून आपलं अस्तित्व सिद्ध करायचं म्हणजे तुमचं कसब पणाला लागतं. ‘पी.एच.डी केलीत तरी कोणतीही पगारवाढ मिळणार नाही, असं माझ्या कंपनीनं मला निक्षून सांगितलं; पण तरीही शिक्षण कधीच वाया जात नाही, म्हणून मी ते पूर्ण केलं.
आम्हाला तुमच्या कार्याविषयी सांगा.
- माझी वृत्ती ही मुळातच ‘संशोधक’ असल्यामुळे मी सक्त ‘नवीन काहीतरी’ याचा शोध घेत असतो. पोलादाच्या मळीचा वापर करून भरभक्कम रस्ते, विमानतळाच्या धावपट्ट्या, आजूबाजूचे रस्ते आणि बांधणी करणाऱ्या संस्थांना मी मदत केली आहे. यासाठी अमेरिका, थायलंड आणि जपान या देशांनी मला निमंत्रित केले आहे. जपान सरकारने तर या कामाचा ‘विशेष तज्ज्ञ’ म्हणून मला नेमले होते. याच कामासाठी मला आस्ट्रेलियन सरकारने ‘आॅनर आॅफ आॅस्ट्रेलिया’ पदवीने मानांकित केले.