...अन्यथा कारवाई, पडताळणीविना मजूर घेऊ नका; ठाणे पाेलिस आयुक्तांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 10:26 IST2025-01-21T10:22:07+5:302025-01-21T10:26:38+5:30
Thane: अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा मोहम्मद ज्या ठिकाणी पकडला, त्या कासारवडलीतील मजूर काॅलनीमध्ये खा. नरेश म्हस्के यांनी रविवारी भेट दिली होती. यासंबंधी ठाण्याचे पाेलिस आयुक्त आशुताेष डुंबरे यांची म्हस्के यांनी सोमवारी भेट घेतली.

...अन्यथा कारवाई, पडताळणीविना मजूर घेऊ नका; ठाणे पाेलिस आयुक्तांचे आदेश
ठाणे - अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा मोहम्मद ज्या ठिकाणी पकडला, त्या कासारवडलीतील मजूर काॅलनीमध्ये खा. नरेश म्हस्के यांनी रविवारी भेट दिली होती. यासंबंधी ठाण्याचे पाेलिस आयुक्त आशुताेष डुंबरे यांची म्हस्के यांनी सोमवारी भेट घेतली. यापुढे असे बांगलादेशी मजूर घेऊ नये, त्याची पडताळणी करावी. तसेच माहिती दडविणाऱ्या मजुरांवर कठाेर कारवाई करावी, असे आदेशच आयुक्तांनी यावेळी दिले. म्हस्के यांच्या मागणीनंतर त्यांनी हे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यात विविध राज्यांमधून कामगार आले आहेत. बांगलादेशी कामगारांची संख्याही वाढली आहे. त्याचीच सत्यता खा. म्हस्के यांनी तपासली.
आतापर्यंत १६ बांगलादेशींवर कारवाई
जानेवारी २०२५ मध्ये भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि ठाणे या परिसरातून १६ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी नऊ गुन्हे दाखल झाले असूून सर्वाधिक पाच गुन्हे कल्याणमध्ये दाखल झाले आहेत.
अनेक कामगारांना विनाचौकशीच थेट कामावर ठेवले जाते. दोन-तीन महिन्यानंतर ते गुन्हेगारीची कामेही करू शकतात.
अशावेळी अनपेक्षित धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कामावर ठेवलेल्या प्रत्येक कामगारांची संपूर्ण माहिती पोलिस ठाण्याला देणे आणि त्यांच्या पार्श्वभूमीची तपासणी करणे गरजेचे असल्याची मागणी म्हस्के यांनी पाेलिस आयुक्त डुंबरे यांच्याकडे केली.
कामगारांची कागदपत्रे तपासणी करून त्यांचे पूर्ण रेकॉर्ड तयार केले जाईल. दिशाभूल करणाऱ्या कामगारांवर कारवाईचे आदेश पाेलिस आयुक्तांनी दिले.