लॉकडाऊनच्या काळातही अवयवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 00:03 IST2020-06-16T00:03:23+5:302020-06-16T00:03:35+5:30
यकृत केले दान : ज्येष्ठ नागरिकाला जीवदान; मुंबईत झाली प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

लॉकडाऊनच्या काळातही अवयवदान
कल्याण : एकीकडे कोरोनाचे संकट गंभीर बनले असतानाही सोमवारी येथील एका खाजगी रुग्णालयात ६१ वर्षांच्या महिलेने मृत्यपश्चात केलेल्या यकृतदानामुळे ६४ वर्षांच्या नागरिकाला जीवदान मिळाले आहे. कोरोनाच्या काळातील हे पहिले अवयवदान डॉक्टरांनी यशस्वीरित्या पार पाडले आहे. त्याचबरोबर अवयवदाना करण्याच्या आईच्या इच्छेमुळे एक जीव वाचू शकलो, हाच मोठा आनंद असल्याची प्रतिक्रिया महिलेच्या मुलाने दिली आहे.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका महिलेला कल्याण येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिची प्रकृती खालावल्याने अखेरीस डॉक्टरांनी तिला ब्रेन डेड घोषित केले. दरम्यान, या महिलेने मृत्यूपश्चात आपले अवयव दान करावे, अशी इच्छा जीवंतपणीच व्यक्त केली होती.
संबंधित महिलेच्या पश्चात मुलगा, सून व मुलगी आहे. आईच्या इच्छेनुसार मुलांनीदेखील अवयवदानासाठी मंजुरी दिली. त्यानंतर रुग्णालयाने हालचाली सुरू करून महिलेचे यकृत मुंबईतील एका रुग्णाला देण्याचा निर्णय घेतला. मुंबईत एका खासगी रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. त्यामुळे ६४ वर्षांच्या नागरिकाला पुनर्जीवन मिळाले.
दरम्यान, खाजगी रुग्णालयाचे क्रिटीकल केअर विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पाटील, न्युरोलॉजीस्ट डॉ. राकेश लल्ला यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांचे पथक या कामासाठी सज्ज होते.
‘अनेक आव्हाने असतानाही यश’
अवयवदानाबद्दल रुग्णालयाच्या फॅसिलिटी डायरेक्टर डॉ. सुप्रिया अमेय म्हणाल्या की, अनेक आव्हाने व कोरोनाचे संकट असतानाही महिलेच्या कुटुंबाने अवयवदानास संमती दिली. रुग्णालय, नर्सिंग स्टाफ, झेडटीसी मुंबई, मेडिकल सोशल वर्क, पोलीस व नातेवाइकांचे सहकार्य यामुळे कोरोनाच्या काळातील हे पहिले अवयवदान यशस्वीरीत्या पार पाडले आणि एक जीव वाचवण्यात आम्हाला यश आल्याचे त्या म्हणाल्या.