अंबरनाथ, बदलापूर, शहापूर आणि मुरबाड नगरपरिषद क्षेत्राच्या सीमा पुढील सूचनेपर्यंत बंद करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 22:54 IST2020-04-10T22:54:04+5:302020-04-10T22:54:46+5:30
संपूर्ण सार्वजनिक वाहतुकीस १० एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले.

अंबरनाथ, बदलापूर, शहापूर आणि मुरबाड नगरपरिषद क्षेत्राच्या सीमा पुढील सूचनेपर्यंत बंद करण्याचे आदेश
ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक खबरदारीची उपाय म्हणून अंबरनाथ व कुळगाव नगरपरिषद आणि मुरबाड, शहापूर नगरपंचायत क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या सर्व बाजूंच्या चतुःसीमा आज संध्याकाळी ६ वाजल्यापासून बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण सार्वजनिक वाहतुकीस १० एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले.
साथ रोग प्रतिबंधात्मक अधिनियम 1897 हा ठाणे जिल्ह्याच्या संपूर्ण क्षेत्रासाठी लागू करण्यात आलेला आहे. या काळात या भागातून कोणत्याही प्रकारची सार्वजनिक वाहतूक रस्त्यावर, गल्लोगल्ली करण्यास सक्त मनाई आहे. यामध्ये सर्व प्रकारची दुचाकी वाहने, तीनचाकी वाहने, रिक्षा, हलकी चारचाकी वाहने, तसेच सर्व प्रकारच्या टॅक्सी आदी वाहनांचा प्रवाशी वाहतुकीस वापर करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश नार्वेकर यांनी दिले आहेत.
अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू व सेवा तसेच परवानगी दिलेल्या ऑन कॉल रिक्षा, आपत्ती व्यवस्थापन वाहने, तसेच मीडिया, विविध परवानगी दिलेल्या आस्थांपनांची वाहने, पाण्याचे टँकर इ. यामधून वगळण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील 51 (b)साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार दंडनीय तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी दिला आहे.