मीरा भाईंदरमधील खड्डयांविरोधात विरोधी पक्षाची एकजूट, ६ तारखेपर्यंत खड्डे भरा अन्यथा ७ रोजी बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 15:10 IST2025-08-03T15:10:13+5:302025-08-03T15:10:33+5:30
मीरा भाईंदर शहरातील रस्ते हे सत्ताधारी आणि प्रशासनाच्या भ्रष्ट व भोंगळ कारभारामुळे खड्ड्यात गेले असून लोकांचे जीव जात आहेत.

मीरा भाईंदरमधील खड्डयांविरोधात विरोधी पक्षाची एकजूट, ६ तारखेपर्यंत खड्डे भरा अन्यथा ७ रोजी बंद
मीरारोड - मीरा भाईंदर शहरातील रस्ते हे सत्ताधारी आणि प्रशासनाच्या भ्रष्ट व भोंगळ कारभारामुळे खड्ड्यात गेले असून लोकांचे जीव जात आहेत. तरी देखील त्यांना खड्डे भरणे व खड्डे भरताना ते टिकाऊ चांगल्या दर्जाचे असावेत याचे सोयर सुतक नसल्याचा आरोप करत ६ ऑगस्टपर्यंत सर खड्डे भरले नाहीत तर ७ रोजी मीरा भाईंदर बंद करणार असल्याचा इशारा काँग्रेस, ठाकरे सेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी संयुक्तपणे दिला आहे.
काँग्रेस, ठाकरे सेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी भाईंदरच्या गोल्डन नेस्ट येथे एकत्र येऊन शहरातील खड्ड्यांवरून बंदचा इशारा दिला आहे. या बाबत पोलीस आयुक्तांना निवेदन दिले असल्याचे सांगत सत्ताधारी भाजपा, शिवसेना आणि महापालिका, एमएमआरडीए, केंद्र सरकारचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण वर टीकेची झोड उठवली.
मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणे म्हणाले कि, भ्रष्ट अधिकारी व आमदारांचे हात बरबटलेले आहेत. निकृष्ठ दर्जाची कामे करून खिसे भरण्याचे काम सुरु आहे. यांना स्वच्छतेचा नाही तर नाकर्तेपणाचा पुरस्कार दिला पाहिजे. खड्डे बुजले नाहीत तर तीव्र आंदोलन असेल.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जिल्हाध्यक्ष ऍड. विक्रम तारे पाटील म्हणाले कि, मेहता आमदार नव्हते तेव्हा तत्कालीन आमदार विरोधात खड्डयां वरून फावडे, घमेले, क्वॉड गाडी घेऊन आंदोलन करत होते. आता ते आमदार निवडून आल्यावर खड्डयां साठी जनतेची माफी मागण्याची ढोंगबाजी करत आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख मनोज मयेकर यांनी आरोप केला कि, सर्वत्र भ्रष्टाचार आणि स्वच्छ आमदार असे ब्रीद वाक्य सत्ताधारी मिरवत आहेत. मागच्यावेळी निवडणुकी आधी आंदोलनाची नौटंकी केली. आता पत्र देतात - माफी मागण्याचा कांगावा करतात. लवकरच दहीहंडी, गणेशोत्सव सारखे सण येत आहेत. त्यामुळे ६ ऑगस्ट पर्यंत खड्डे भरले नाही तर सर्व मिळून बंद करणार.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी सांगितले कि, २०१७ पासून पालिकेत भाजपाची सत्ता आहे. भ्रष्टाचार आणि पालिका लुटून कंगाल करून टाकली आहे. केवळ करोडोंचे ठेके काढून कामे मात्र बोगस निकृष्ठ करून लोकांची जीव घेतले जात आहेत. खड्डे बुजवात नाहीत, बस ठेकेदारास द्यायला पैसे नाहीत आणि भाजपा व पालिका सेलिब्रेशन करत आहेत.
काँग्रेसचे माजी नगरसेवक जुबेर इनामदार, प्रवक्ते प्रकाश नागणे, युवक जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे ; शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रे, धनेश पाटील, प्राची पाटील ; राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे गुलाम नबी फारुकी, रवी दुबोले, विनोद जगताप, बाबुराव भिलारे आदींसह या सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.