अर्थ खाते राष्ट्रवादीकडे सोपवण्यास शिंदे समर्थक आमदारांचा विरोध?; शिंदेंच्या बंगल्यावर खलबते
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 06:21 IST2023-07-04T06:20:27+5:302023-07-04T06:21:11+5:30
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर दोन तास खलबते

अर्थ खाते राष्ट्रवादीकडे सोपवण्यास शिंदे समर्थक आमदारांचा विरोध?; शिंदेंच्या बंगल्यावर खलबते
ठाणे : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना अर्थ खाते दिल्यास पुन्हा शिवसेना आमदारांची आर्थिक नाकेबंदी होईल. तेच संकट आता येणार का? अशी भीती शिंदे समर्थक मंत्री व आमदारांना वाटत आहे. मंत्रिमंडळ विस्तार व सत्तेचे वाटप या विषयांवर शिंदे यांच्या येथील बंगल्यावर तब्बल दोन तास शिंदे समर्थक मंत्री, आमदारांची खलबते झाली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून काही बाबींसंबंधी स्पष्टता करून घेण्याचा आग्रह आमदारांनी धरल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीला शिंदे गटाचे मंत्री, आमदार व खा. राहुल शेवाळे हे हजर होते. राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना निधी व जिल्ह्याजिल्ह्यांतील सत्तेचे वाटप यावरून असलेले जुने वाद पुन्हा उफाळून येण्याची दाट शक्यता या मंत्री तसेच आमदारांनी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.
याशिवाय रायगड, नाशिक, सातारा जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये मतभेद आहेत, असेही या आमदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले. शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी झालेल्या बैठकीस मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, दादा भुसे, तसेच आ. संजय शिरसाट आदींसह इतर आमदार उपस्थित होते.
काय चर्चा झाली?
तब्बल दोन तास चाललेल्या बैठकीत शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या कामांकरिता निधी, मंत्रिमंडळ विस्तार यावर चर्चा झाल्याचे समजते. संजय शिरसाठ म्हणाले, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही ठाण्यात आलाे होतो. शिंदे यांच्या घरी राजकीय चर्चा झाली नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना नमन करण्यासाठी आम्ही आल्याचे सांगत अजित पवारांच्या सरकारमधील समावेशावर त्यांनी बोलणे टाळले.